Ola S1 New Varient: ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 18:14 IST2022-10-06T18:13:16+5:302022-10-06T18:14:25+5:30
दसऱ्याला ओलाच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीबाबत ते म्हणाले होते की ओलाच्या स्कूटरची विक्री दिवसाला दहा पटींनी वाढली आहे.

Ola S1 New Varient: ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट
या महिन्यात फेस्टिव्ह सिझनचा लाभ घेत ओला स्कूटरवर १० हजारांचा डिस्काऊंट जारी करत ओला इलेक्ट्रीक पहिल्या क्रमांकावर आली आहे. या कंपनीने हिरो, ओकिनावासारख्या कंपन्यांना विक्रीमध्ये मागे टाकले आहे. असे असताना ओलाचे सीईओ भाविश अग्रवालांनी दिवाळीपूर्वी काहीतरी मोठे करण्याच्या विचारात असल्याचे ट्विट केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार कंपनी Ola S1 स्कूटरचे सर्वात स्वस्त व्हेरिअंट लाँच करू शकते. काही महिन्यांपूर्वीच ओलाने एस१ स्कूटरचे काही कारणांसाठी बंद केलेले मॉडेल रिलाँच केले होते. यामुळे ओलाच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. ओलाचा सेल खूपच कमी झाला होता. तो चौपट वाढला आहे. असे असताना ओला या स्कूटरचे नवीन व्हेरिअंट लाँच करण्याची शक्यता आहे.
या स्कूटरची किंमत ८० हजार रुपयांपेक्षाही कमी असण्याचा अंदाज आहे. ओलाची एस १ सध्या १ लाख रुपयांना मिळते, तर एस १ प्रो ही १.४० लाखांना जाते. ओला इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक आणि सीईओ भावीश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर दिवाळीच्या आधीच्या तयारीचे संकेत दिले. 'या महिन्यात काहीतरी मोठे लॉन्च करण्याची योजना आहे! जे किमान 2 वर्षांनी #EndICEAge क्रांतीला गती देईल.', असे ते म्हणाले.
दसऱ्याला ओलाच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीबाबत ते म्हणाले होते की ओलाच्या स्कूटरची विक्री दिवसाला दहा पटींनी वाढली आहे. हा ओला स्कूटरचा पहिलाच दसरा आहे. नवरात्रीच्या काळात कंपनीने दर मिनिटाला एक स्कूटर विकल्याचा दावा त्यांनी केला होता. Ola S1 स्कूटर 3kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, ती चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात. तर इको मोडवर 131 किलोमीटरची रेंज देते.