आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:13 IST2025-12-04T17:12:50+5:302025-12-04T17:13:45+5:30
Nitin Gadkari Ethanol fuel Innova: इथेनॉलच्या वापराने किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, हे देखील गडकरी यांनी यावेळी हिशेब मांडत सांगितले.

आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील इंधनाच्या भविष्याची झलक दाखवली. ते दिल्लीमध्ये १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या 'फ्लेक्स-फ्युएल' टोयोटा इनोव्हा कारमधून प्रवास करताना दिसले. प्रदूषण कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व संपवणे, हेच भारताचे भविष्य आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इथेनॉलच्या वापराने किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, हे देखील गडकरी यांनी यावेळी हिशेब मांडत सांगितले. सध्या बाजारात इथेनॉलची किंमत अंदाजे ₹६५ प्रति लीटर आहे, तर पेट्रोलची किंमत सुमारे ₹१२० प्रति लीटर आहे. प्रवास करताना ही कार ६० टक्क्यांपर्यंत वीजही निर्माण करते. त्यामुळे या वाहनाने प्रवास करण्याचा प्रभावी खर्च सुमारे ₹२५ प्रति लीटर इतका कमी होतो, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
जेव्हा इंधन इतके स्वस्त होईल, तेव्हाच लोक मोठ्या संख्येने इथेनॉलचा स्वीकार करतील. इथेनॉल थेट शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, कारण ते कृषी उत्पादने आणि त्यांच्या उप-उत्पादनांमधून (उदा. तांदूळ, मका, उसाचा रस, शेतीतला कचरा) तयार केले जाते. यामुळे प्रदूषण होत नाही आणि हे 'ग्रीन फ्युएल' असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.
#WATCH | Delhi | Riding in a flex fuel car, Union Minister Nitin Gadkari says," This car works on 100% bio-ethanol. As compared to petrol, ethanol costs Rs 65 per litre. During operation, the car generates 60% electricity. It is green fuel; this will help curb pollution and also… pic.twitter.com/ggxlzXYFuM
— ANI (@ANI) December 3, 2025
सध्याची स्थिती
सध्या देशात सुमारे ५५० इथेनॉल प्लांट कार्यरत आहेत आणि पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याची योजना आधीच लागू झाली आहे. या ई २० वरून आधीच वाहन मालक त्रस्त झालेले आहेत. परंतू, त्यांचा आवाज ऐकला जात नाहीय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार आणि गडकरींवर टीका झाली होती. वाहनाचा मेन्टेनन्स वाढला आहे, इंधनाच्या टाकीत इथेनॉलमुळे पाणी तयार होण्याचा धोका वाढलेला आहे. तसेच वाहन मायलेजही कमी देत आहे. अशाप्रकारे तिहेरी हल्ला वाहन मालकांवर झालेला आहे.