निसानचा सर्वात मोठा रिकॉल! ६.४ लाख गाड्यांमध्ये इंजिनचा दोष; अचानक आग लागण्याची शक्यता, कंपनीने 'Rogue' SUV परत मागवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:27 IST2026-02-25T11:27:00+5:302026-02-25T11:27:41+5:30
Nissan Rogue recall engine defect: निसान मोटर्सने Rogue SUV च्या ६.४ लाख गाड्यांमधील इंजिन दोषासाठी रिकॉल जाहीर केला आहे. इंजिन बे मध्ये आग लागण्याची शक्यता असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

निसानचा सर्वात मोठा रिकॉल! ६.४ लाख गाड्यांमध्ये इंजिनचा दोष; अचानक आग लागण्याची शक्यता, कंपनीने 'Rogue' SUV परत मागवली
जपानची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी निसान मोटर्सने आपल्या लोकप्रिय Rogue एसयूव्हीच्या ६.४ लाखांहून अधिक गाड्या परत मागवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या इंजिन आणि थ्रॉटल सिस्टममध्ये गंभीर तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
निसानच्या २०२३-२०२५ मॉडेलच्या ज्या गाड्यांमध्ये १.५ लिटर VC टर्बो इंजिन आहे, त्यांच्यामध्ये 'बेअरिंग फेलियर'ची समस्या आढळली आहे. यामुळे इंजिनमधून गरम तेल लीक होऊन आग लागण्याचा धोका वाढला आहे. तसेच, चालत्या गाडीत अचानक पावर कमी झाल्यामुळे अपघाताची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
थ्रॉटल बॉडी गियरमध्ये बिघाड
दुसरी मोठी समस्या २०२४-२०२५ रॉग मॉडेल्सच्या 'थ्रॉटल बॉडी गियर'शी संबंधित आहे. हा गियर तुटल्यास वाहन अचानक वेग गमावू शकते किंवा गाडी पुन्हा सुरू करताना अडथळे येऊ शकतात. हायवेवर अशा प्रकारे वेग कमी होणे चालकासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
ग्राहकांनी काय करावे?
निसान मार्च २०२६ पासून संबंधित ग्राहकांना अधिकृत ईमेल पाठवणार आहे. ज्या ग्राहकांकडे रॉग मॉडेल आहे, ते निसानच्या वेबसाइटवर किंवा NHTSA च्या पोर्टलवर आपला VIN टाकून तपासणी करू शकतात. कंपनीचे डीलर्स विनामूल्य इंजिन सॉफ्टवेअर रिप्रोग्राम करतील आणि आवश्यक ते सुटे भाग बदलून देतील.