गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:00 IST2017-10-16T18:00:00+5:302017-10-16T18:00:00+5:30
कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे.

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे
टायरच्या बाबतीत अनेकजण बेफिकिर असतात. वैयक्तिक वापरासाठी कार घेतलेले अनभिज्ञ असल्याने त्यांना फार माहिती नसल्याने अनेकदा टायरचे आयुष्य संपल्यानंतरही तो वापरत असतात तर बराच प्रवास केल्यानंतर टायर गोटा होण्यापूर्वीच ते टायर बदलतातही. मात्र दुचाकी वापरणारे बरेचजण टायर बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत, फार वापर नाही,चलता है, फार लांब जात नाही, जवळपास जाण्यासाठीच वापरतो, असे सांगत टायर बदलून नवीन टायर बसवावा, असे अनेक स्कूटर मालकांना वाटत नाही. किमान पाच वर्ष तरी मी टायर बदलत नाही, असे सांगणारेही काही महाभाग भेटले. कारच्या बाबतीत पाहिले तर टॅक्सी,टुरिस्टसाठी वैयक्तिक नोंदणीच्या एसयूव्ही वापरणारे, रिक्षावाले, मालवाहतूक करणारे,पाण्याचे टॅकर्स यांच्या अनेकांच्या टायर्सची स्थिती फार बिकट असते, तरीही ते भारतीय स्थितीत गाड्या चालवतात. त्यांना पैसे वाचवणे हे महत्त्वाचे वाटते.
साधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतो. वैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतात. मात्र टॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात.
टायरवरील नक्षीकाम व त्याची खोली चांगली असली पाहिजे पण ते नक्षीकामही दिसेनासे झाल्यानंतर टायर वापरणे हे धोकादायक आहे. सुरक्षित नाही. त्यामुळे वाहन स्कीट होऊन उलटणे, रस्त्यावर ग्रीप वा पकड नसणे, ब्रेक नीट न लागणे, टायर अनेकदा पंक्चर होणे, तो जास्त गर होऊन ब्लास्टही होणे असे प्रकार होत असतात. असे टायर रिमोल्ड करण्याच्याही पात्रतेचे नसतात. यासाठीच गोटा झालेले हे टायर पूर्णपणे निकाली काढणेच गरजेचे आहे. खरे म्हणजे अशा वाहनांची तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची गरज आहे.प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्रास हे टायर वापरले जातात. डंपर, कचर्याच्या गाड्या या अशाच टायरवर चालवायच्या असतात, त्याने खर्च वाचतो, अशी धारणाच अशा वाहनांच्या मालकांनी करून घेतलेली असते. भारतात अजून तरी या प्रकारावर आवश्यक तितके निर्बंध नाहीत, ते घातले जाणे गरजेचे आहे. किमान त्यामुळे दुसऱ्याच्या प्राण व वित्तहानीचे तरी नुकसान होणार नाही.