मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:25 IST2025-12-17T16:25:10+5:302025-12-17T16:25:44+5:30
CNG PNG Rate Reduced from Jan 1: १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी स्वस्त होणार. मोदी सरकारने गॅस ट्रान्सपोर्ट शुल्कात केली कपात. पहा तुमच्या शहरात किती रुपये वाचतील.

मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात कपात करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने गॅस वाहतुकीच्या शुल्कात मोठी कपात जाहीर केली असून, याचे नवे दर १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.
PNGRB ने घेतलेल्या निर्णयानुसार, गॅस वाहतुकीसाठी आता 'युनिफाइड टॅरिफ' प्रणाली लागू केली जाईल. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन थेट ग्राहकांना फायदा मिळणार आहे. यामुळे सीएनजी प्रति किलो १.२५ ते २.५० रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर पीएनजी घरगुती वापराच्या पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट ०.९० ते १.८० रुपयांची कपात होऊ शकते.
'एक देश, एक ग्रिड, एक टॅरिफ' सरकारने नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी तीन झोनऐवजी आता केवळ दोन झोनमध्ये विभाजन केले आहे. यापूर्वी ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गॅस पाठवण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागत होते. मात्र, नव्या नियमानुसार ३०० किमी पेक्षा जास्त अंतरासाठीचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी होईल. या निर्णयाचा फायदा देशभरातील ३१२ भौगोलिक क्षेत्रांमधील ४० शहरांतील गॅस वितरण कंपन्यांना होईल.
कोणाला होणार फायदा?
या निर्णयामुळे मुंबईतील 'महानगर गॅस', दिल्लीतील 'इंद्रप्रस्थ गॅस' आणि अदानी टोटल गॅस यांसारख्या कंपन्यांना होणारा गॅस पुरवठा स्वस्त होईल. याचा थेट लाभ रिक्षा-टॅक्सी चालक, खाजगी वाहन चालक आणि स्वयंपाकघरात पाईप गॅस वापरणाऱ्या गृहिणींना मिळेल.