Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:59 IST2025-12-17T18:51:09+5:302025-12-17T18:59:58+5:30
Maruti Suzuki WagonR : स्विव्हल सीटमुळे कारमध्ये बसणे आणि उतरने अधिक सोपे आणि अडथळामुक्त होते.

Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Maruti Suzuki WagonR : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक WagonR चे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यामध्ये देण्यात आलेली ‘स्विव्हल सीट’ (फिरणारी सीट). ही सुविधा विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली असून, ‘इन्क्लुझिव मोबिलिटी’ला चालना देणारे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
आता कारमध्ये चढणे-उतरणे अधिक सुलभ
स्विव्हल सीटमुळे कारमध्ये बसणे आणि उतरने अधिक सोपे आणि अडथळामुक्त होते. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना रोजच्या प्रवासात अधिक सन्मान, सुरक्षितता आणि आराम मिळणार आहे. मारुती सुझुकीने हा उपक्रम सर्वसमावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले आहे.
कठोर सेफ्टी चाचणी, आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत
कंपनीने सांगितल्यानुसार, हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय क्रमांक 10 (असमानता कमी करणे) यानुसार आहे. या स्विव्हल सीट किटची ARAI (Automotive Research Association of India) मध्ये कडक सुरक्षा चाचणी करण्यात आली असून, ती सर्व आवश्यक सेफ्टी मानकांवर पात्र ठरली आहे. सध्या ही सुविधा 11 शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून, ग्राहकांच्या प्रतिसादानुसार भविष्यात याचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
रेट्रोफिटमेंट किट म्हणूनही उपलब्ध
या उपक्रमासाठी मारुती सुझुकीने NSRCEL–IIM बंगळुरुच्या स्टार्टअप इनक्युबेशन प्रोग्रामअंतर्गत बंगळुरूस्थित TrueAssist Technology Pvt. Ltd. या स्टार्टअपसोबत भागीदारी केली आहे. ग्राहक, मारुती सुझुकी एरिना डीलरशिपवर ही स्विव्हल सीट रेट्रोफिटमेंट किट स्वरुपात ऑर्डर करू शकतात. ही सीट नवीन WagonR मध्ये बसवता येईल, तसेच विद्यमान WagonR गाड्यांमध्येही नंतर बसवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सुलभ प्रवास आता सर्वांसाठी
लॉन्चच्या वेळी मारुती सुझुकी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, WagonR ही भारतातील टॉप-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. त्यामुळे अॅक्सेसिबिलिटी फीचर सादर करण्यासाठी हे मॉडेल अत्यंत योग्य आहे. स्विव्हल सीटमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना रोजचा प्रवास अधिक सन्मानाने आणि सोयीस्कर पद्धतीने करता येईल.