ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:42 IST2025-12-25T12:42:21+5:302025-12-25T12:42:55+5:30
Maruti Suzuki Fronx 1 Star Rating: न्यूझीलंडमध्ये विक्री होणारी 'फ्रॉन्क्स' ही भारतातूनच निर्यात केली जाते. मात्र, मारुती सुझुकीने अद्याप भारतीय बाजारपेठेतील गाड्यांबाबत कोणतीही अधिकृत 'रिकॉल' नोटीस जारी केलेली नाही.

ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
भारतीय बाजारपेठेत अल्पावधीत लोकप्रिय झालेली मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'फ्रॉन्क्स' सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. न्यूझीलंडमध्ये सुझुकीने आपल्या 'फ्रॉन्क्स' मॉडेलची विक्री तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या मानकांबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुझुकी फ्रॉन्क्सच्या एअरबॅग कंट्रोल सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक त्रुटी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील कडक सुरक्षा नियमांनुसार, जोपर्यंत या त्रुटीचे पूर्णपणे निराकरण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्यांची विक्री आणि डिलिव्हरी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलेशियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ANCAP) ने घेतलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला केवळ १-स्टार रेटिंग मिळाले आहे. क्रॅश टेस्ट दरम्यान सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, कारमधील मागच्या सीटचा सीटबेल्ट पूर्णपणे निकामी ठरला. जोरात धडक बसताच सीटबेल्टचे 'रिट्रॅक्टर' फेल झाले, ज्यामुळे मागच्या सीटवर बसलेली डमी अनियंत्रित होऊन थेट पुढच्या सीटवर आदळली. ANCAP ने याला "दुर्मिळ पण अत्यंत गंभीर सुरक्षा चूक" असे म्हटले आहे.
मागच्या सीटवर बसू नका, ग्राहकांना सूचना
न्यूझीलंडमध्ये सध्या १,११५ फ्रॉन्क्स कार रस्त्यावर आहेत. या सर्व कार मालकांना सुझुकीने अधिकृत सूचना जारी केली आहे. जोपर्यंत सीटबेल्टमधील तांत्रिक बिघाड शोधून तो दुरुस्त केला जात नाही, तोपर्यंत मागच्या सीटवर प्रवाशांना (प्रौढ किंवा मुले) बसवू नका, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय ग्राहकांवर परिणाम होणार का?
न्यूझीलंडमध्ये विक्री होणारी 'फ्रॉन्क्स' ही भारतातूनच निर्यात केली जाते. मात्र, मारुती सुझुकीने अद्याप भारतीय बाजारपेठेतील गाड्यांबाबत कोणतीही अधिकृत 'रिकॉल' नोटीस जारी केलेली नाही. सुझुकीने न्यूझीलंडमधील आपल्या डीलर्सना नवीन स्टॉक विकण्यापासून रोखले असून, आधीच विकल्या गेलेल्या गाड्यांच्या सॉफ्टवेअर अपडेटसाठी लवकरच कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको म्हणून हा खबरदारीचा उपाय म्हणून घेतला गेला आहे.
सुरक्षा चाचणीतील आकडेवारी:
प्रौढ प्रवासी सुरक्षा: ४८% (खराब)
बाल प्रवासी सुरक्षा: ४०% (अत्यंत खराब)
पादचारी सुरक्षा: ६५%
सेफ्टी असिस्टंट: ५५%