बिनधास्त खरेदी करा ईव्ही! आता चार्जिंगचं टेन्शन संपणार; 'ही' कंपनी १० हजारी धमाका करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 21:00 IST2022-02-19T20:56:53+5:302022-02-19T21:00:53+5:30
ईव्ही चार्जिंग क्षेत्रात मोठा धमाका; सरकारी कंपनीची मोठी घोषणा

बिनधास्त खरेदी करा ईव्ही! आता चार्जिंगचं टेन्शन संपणार; 'ही' कंपनी १० हजारी धमाका करणार
मुंबई: देशाच्या कानाकोपऱ्यात पेट्रोल पोहोचवणाऱ्या इंडियन ऑईल कंपनीनं आता इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनमध्ये मोठा धमाका करण्याची तयारी केली आहे. कंपनीनं देशातल्या ५०० शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स सुरू केली आहेत. कंपनीनं पुढच्या ३ वर्षांसाठी मेगाप्लान तयार केला आहे.
इंडियन ऑईलनं दिलेल्या वृत्तानुसार, सध्या कंपनीनं १ हजारहून अधिक चार्जिंग स्टेशन्स कार्यन्वित केली आहेत. पुढल्या ३ वर्षात १० हजार पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या देशातील ५०० शहरं आणि निमशहरी भागांत इंडियन ऑईलनं चार्जिंग स्टेशन्स सुरू केली आहेत. यातील काही स्टेशन्स महामार्गांच्या अगदी शेजारीच आहेत. महामार्गांना लागून ३ हजार चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
ईलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. उर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या ९ मोठ्या शहरांमधील चार्जिंग स्टेशन्सची संख्या अडीच पटीनं वाढली आहे. या ९ शहरांत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सूरत, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबादचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात ६७८ चार्जिंग स्टेशन्स होती. जानेवारी २०२२ मध्ये हाच आकडा १६४० वर पोहोचला आहे. यातील ९४० स्टेशन्स ९ मोठ्या शहरांत आहेत.