समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:37 IST2025-10-28T12:36:47+5:302025-10-28T12:37:17+5:30
Ola electric Spare Part: ओला ईलेक्ट्रीक कंपनी सर्व्हिसच्या वादानंतर आपल्या ग्राहकांसाठी नवीन पर्याय घेऊन आली आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने, स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने हजारो गाड्या आजही धूळ खात पडून आहेत.

समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
भारतातील ईलेक्ट्रीक दुचाकींच्या क्षेत्रात आघाडीवर असलेली आणि आता पिछाडीवर पडत चाललेली ओला ईलेक्ट्रीक कंपनी सर्व्हिसच्या वादानंतर आपल्या ग्राहकांसाठी नवीन पर्याय घेऊन आली आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने, स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने हजारो गाड्या आजही धूळ खात पडून आहेत. अशातच कंपनीने आपल्या ग्राहकांना ओलाच्या अॅपवरच स्पेअर पार्ट उपलब्ध करून दिले आहेत. एवढेच नाही तर प्रशिक्षित मेकॅनिककडून ते बदलून घेण्याची आणि दुरुस्ती करण्याची मुभाही दिली आहे.
आतापर्यंत केवळ ओलाच्या अधिकृत नेटवर्कसाठी उपलब्ध असलेले जेन्युइन स्पेअर पार्ट्स, डायग्नोस्टिक टूल्स आणि सर्व्हिस ट्रेनिंग मॉड्यूल्स देशभरातील स्वतंत्र गॅरेज, मेकॅनिक आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी खुले करण्यात आले आहेत. कंपनीचा मालक भाविष अग्रवालने याची माहिती त्याच्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. कंपनीने यासाठी खास ॲप (App) आणि वेबसाईट लाँच केली आहे. याद्वारे ग्राहक आणि मेकॅनिक थेट ओलाचे प्रमाणित स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकतील. यामुळे ईव्ही सर्व्हिसिंगच्या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
ओलाने आतापर्यंत १० लाखांहून अधिक स्कूटर विकल्या आहेत. यापैकी बऱ्याच स्कूटर या सर्व्हिस नसल्याने कचऱ्यात धुळ खात पडल्या आहेत. ओलाच्या सर्व्हिस सेंटरवरच अशा कित्येक स्कूटर दिसतात. या नवीन हायपर सेवेमुळे ओलाचे ग्राहक आता कंपनीच्या सेवेवर अवलंबून राहणार नाहीत. सध्या ओलाच्या ग्राहकांच्या ॲपवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर मुख्य स्पेअर पार्ट्स खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओलाच्या स्कूटर कशा दुरुस्त करायच्या, त्यांतील समस्या आदी गोष्टी शिकण्यासाठी ओला डायग्नोस्टिक टूल्स आणि तंत्रज्ञ प्रमाणन कार्यक्रम देखील राबविणार आहे. यामुळे खुल्या बाजारात स्पेअर पार्ट मिळतील आणि दुरुस्ती देखील सोपी होणार आहे.