विक्रीपश्चात सेवेत ह्युंदाई पहिली; लाडकी मारुती कितव्या क्रमांकावर पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 08:02 IST2018-10-28T07:50:32+5:302018-10-28T08:02:27+5:30
देशात वाहन उद्योगाने कमालीचा वेग पकडला आहे. पुढील वर्षात आणखी दोन कंपन्या येऊ घातल्या आहेत. मात्र, या कंपन्या वाहनांची विक्री केल्यानंतर किती दर्जेदार सेवा पुरवितात याचे एक सर्व्हेक्षण समोर आले आहे.

विक्रीपश्चात सेवेत ह्युंदाई पहिली; लाडकी मारुती कितव्या क्रमांकावर पाहा...
देशात वाहन उद्योगाने कमालीचा वेग पकडला आहे. पुढील वर्षात आणखी दोन कंपन्या येऊ घातल्या आहेत. मात्र, या कंपन्या वाहनांची विक्री केल्यानंतर किती दर्जेदार सेवा पुरवितात याचे एक सर्व्हेक्षण समोर आले आहे. जे. डी. पावरने भारतीय ग्राहकांकडून ही माहिती मिळविली आहे. यामध्ये देशभरात सर्वात मोठे विक्री आणि सेवेचे जाळे असलेल्या मारुती सुझुकीचा पहिला क्रमांक नाही तर विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाईने बाजी मारली आहे.
वाहन निर्मात्या कंपन्या वाहनांचा खप वाढविण्यासाठी मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. मात्र, विक्रीनंतर सेवा देण्यासाठी नाक मुरडतात. बऱ्याचदा ग्राहकाची लुटही केली जाते. यामुळे कंपन्या बदनाम होतात. काही वर्षांपूर्वी बदनाम कंपन्यांमध्ये फोर्ड इंडियाचा पहिला क्रमांक लागत होता. मात्र, आता रुप पालटले आहे.
जे. डी. पावरने केलेल्या या सर्व्हेमध्ये ह्युंदाईने 912 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर टाटा मोटर्सने 874 गुण मिळवत दुसरा क्रमांक आणि महिंद्राने 865 गुण मिळवत तिसरा क्रमांक गाठला आहे. यामध्ये मारुती सुझुकी मात्र एकदल रसातळाला गेल्याचे दिसत आहे. तर बदनाम झालेल्या फोर्डने गेल्या काही वर्षांत ग्राहकांना चांगली सेवा पुरवत 829 गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे.
देशवासियांचे श्रद्धास्थान असलेली मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांचा दर्जा घसरण्याबरोबरच सेवाही घसरली आहे. या सर्व्हेतील एकूण 11 कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचा आठवा क्रमांक लागत आहे. मारुतीली 804 गुण मिळाले आहेत. या सर्व्हेमध्ये 28 टक्के मते ही 30 वयोगटातील तरुण ग्राहकांनी नोंदविली आहेत. तर उर्वरित मतांमध्ये 30 पेक्षा जास्त वयोगटातील ग्राहकांचा समावेश आहे.