जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:30 IST2025-09-03T18:18:46+5:302025-09-03T18:30:39+5:30
Tesla in India : टेस्लाने भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये आपले शोरुम उघडले आहेत. ही तिन्ही शहरे अब्जाधीशांची, शौकिनांची म्हणून ओळखली जातात.

जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
जगातील सर्वात मोठ्या ईलेक्ट्रीक कार कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतात एन्ट्री केली आहे. गेल्या जुलै महिन्यात टेस्लाने आपली पहिली ईव्ही कार लाँच केली होती. टेस्लाचे मॉडेल वाय लाँच होऊन आता जवळपास दीड महिना उलटला आहे. या काळात टेस्लाने आपल्या कारसाठी किती बुकिंग मिळविली असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचा आकडा नुकताच समोर आला आहे.
जगभरात दर तासाला ६०० कार विकणाऱ्या टेस्लाने भारतात या दीड महिन्याच्या काळात केवळ ६०० बुकिंग मिळविल्या आहेत. हा आकडा ना कंपनीला अपेक्षित होता ना अब्जाधीश एलन मस्क यांना. कारण हे कंपनीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. कंपनीच्या सुत्रांनुसार भारतात मिळालेले बुकिंग हे कंपनीच्या अपेक्षेनुसार खूप कमी आहे.
टेस्लाने भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुमध्ये आपले शोरुम उघडले आहेत. ही तिन्ही शहरे अब्जाधीशांची, शौकिनांची म्हणून ओळखली जातात. परंतू. या शहरांत टेस्लाच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. यामुळे टेस्लाने या बुकिंपैकी ३५० ते ५०० कार डिलिव्हर करण्याचा विचार सुरु केला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस टेस्लाच्या कार डिलिव्हर होण्यास सुरुवात होणार आहे. टेस्लाच्या कार या मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरुग्राम या भागातच डिलिव्हर केल्या जाणार आहेत.
टेस्लाच्या अपेक्षेवर पाणी फेरण्यामागे काही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. एकतर टेस्लाची कार कर जास्त बसत असल्याने खूप महाग आहे. भारतात सरासरी ईव्ही कारची मागणी असलेली किंमत ही २२ लाख रुपये आहे. तर टेस्लाची मॉडेल वाय ही कार ६० लाख रुपयांपासून पुढे सुरु होते. याचा फटका टेस्लाला बसत आहे. एवढेच नाही तर ट्रम्प यांच्यासोबत भारताचे बिघडलेले संबंध देखील कारणीभूत आहेत. याशिवाय एलन मस्कही विविध कारणांनी वादग्रस्त असल्याने त्याचाही परिणाम दिसत आहे.