Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 19:20 IST2022-10-06T19:20:11+5:302022-10-06T19:20:38+5:30
हिरो मोटोकॉर्पने तैवानची कंपनी गोगोरोसोबत सहकार्य करार केला आहे. दोन्ही कंपन्या भारतात मिळून इलेक्ट्रीक स्कूटर तयार करणार आहेत.

Hero Motocorp Vida Electric Scooter Launch: खऱ्या हिरो मोटोकॉर्पची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर उद्या लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत, रेंज
जगातील सर्वात मोठी टु व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रीक स्कूटरच्या बाजारात पहिले पाऊल टाकणार आहे. उद्याचा दिवस खास असून या दिवशी हिरोचा ब्रँड विडा पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहे.
हिरो इलेक्ट्रीक नावाची आणखी एक कंपनी बाजारात आधीपासून आहे, परंतू ती हिरोपासून दहा वर्षांपूर्वीच वेगळी झालेली आहे. यामुळे खऱ्या हिरो मोटोकॉर्पने न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर विडा हा ब्रँड भारतीय बाजारात काही महिन्यांपूर्वीच लाँच केला होता. यानंतर या ब्रँडच्या पहिल्या स्कूटरची उत्सुकता होती. या स्कूटरबाबत एक महत्वाची माहिती येत आहे, ही स्कूटर स्वॅपेबल बॅटरीची असणार आहे.
हिरो मोटोकॉर्पने तैवानची कंपनी गोगोरोसोबत सहकार्य करार केला आहे. दोन्ही कंपन्या भारतात मिळून इलेक्ट्रीक स्कूटर तयार करणार आहेत. गोगोरो ही कंपनी बॅटरी चार्जिंग सेंटरसाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी बॅटरी भाड्याने म्हणजेच चार्ज करून देते. ग्राहक त्यांची संपलेली बॅटरी बदलून त्या बदल्यात दुसरी चार्ज बॅटरी घेऊन पुढे प्रवास सुरु ठेवतात. यामुळे रेंजचा मुख्य प्रश्नच मिटणार आहे. ग्राहकांचे बॅटरी चार्जिंगची चिंता मिटणार आहे.
हिरोच्या या पहिल्या स्कूटरची रेंज ही १५० किमीची असू शकते. तसेच ही स्कूटर एक लाखांच्या आत असू शकते. सध्य़ा ओला, एथर, हिरो इलेक्ट्रीक आणि ओकिनावा या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ व्यापलेली आहे. परंतू यांच्याकडे बॅटरी स्वॅपिंगची सोय नाहीय. यामुळे ग्राहकांना तासंतास बॅटरी चार्ज करावी लागते. बंगळुरूच्या एका कंपनीने ही सोय आणली होती, परंतू ती कंपनी आली कधी आणि गेली कधी हे देखील लोकांना समजलेले नाही. हिरो ही तगडी कंपनी असल्याने या स्कूटरला मोठी मागणी होण्याची शक्यता आहे.