Hero Moto Vs. Hero Electric: नावात काय आहे? हिरो मोटो कॉर्प आणि हिरो इलेक्ट्रीकमध्ये जुंपली; बाप-बेटे न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 10:23 IST2022-01-11T10:22:54+5:302022-01-11T10:23:17+5:30
Hero Moto Vs. Hero Electric in Court: दोन्हींची नावे सारखीच असल्याने हिरो मोटो कॉर्पचीच हिरो इलेक्ट्रीक कंपनी असल्याचे लोकांना वाटत आहे. परंतू तसे नाही, हिरो ग्रुप दोन कुटुंबांत विभागला गेला आहे.

Hero Moto Vs. Hero Electric: नावात काय आहे? हिरो मोटो कॉर्प आणि हिरो इलेक्ट्रीकमध्ये जुंपली; बाप-बेटे न्यायालयात
हिरो-होंडा जशी वेगळी झाली तशी हिरो कंपनीचेही दोन कुटुंबात विभाजन झाले आहे. दशकभरापूर्वी मुंजाल फॅमिलीमध्ये हिरो कंपनीची इलेक्ट्रीक विंग आणि मोटोकॉर्प असे विभागले गेले. आज दशकभराने हिरो कंपन्यांचे हे दोन मालक पुन्हा आमनेसामने आले आहेत. तेव्हा झालेल्या करारानुसार विजय आणि नवीन मुंजाल (पिता-पूत्र) यांना हिरो इलेक्ट्रीकची मालकी मिळाली, तर पवन मुंजाल यांना हिरो मोटोकॉर्पची मालकी. करारातील दाव्यानुसार विजय मुंजाल यांना इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरण्याची परवानगी आहे, यामुळे मुळ हिरो कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरू नये असा दावा हिरो इलेक्ट्रीकने ठोकला आहे.
सध्या इलेक्ट्रीक वाहनांचे युग आहे. हिरो ही देशातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी आहे. यामुळे जर दहा वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या कंपनीचे बाजारातील महत्व वाढले तर मूळ पेट्रोलच्या स्कूटर बनविणाऱ्या कंपनीला भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. तसेच हिरो मोटोकॉर्पने आता हिरो नावाने इलेक्ट्रीक वाहने काढली तर त्याचा फटका विभाजन झालेल्या कंपनीला बसणार आहे.
या वादामुळे हिरो इलेक्ट्रीकने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. हिरो मोटो कॉर्पने त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो या नावाचा वापर करू नये असे हिरो इलेक्ट्रीकचे म्हणणे आहे. हिरो मोटो कॉर्पने त्यांच्या इव्ही स्कूटरवर हिरो नाव टाकण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तरी देखील सावधगिरी म्हणून हिरो इलेक्ट्रीकने हे पाऊल उचलल्याने आता दोन कुटुंबात पुन्हा वाद वाढण्य़ाची चिन्हे आहेत.
दोन्हींची नावे सारखीच असल्याने हिरो मोटो कॉर्पचीच हिरो इलेक्ट्रीक कंपनी असल्याचे लोकांना वाटत आहे. परंतू तसे नाही, हिरो ग्रुप दोन कुटुंबांत विभागला गेला आहे. दहा वर्षांपूर्वी दोन्ही मालकांना याची कल्पना नव्हती की इलेक्ट्रीक वाहनांची एवढी मोठी मागणी वाढेल, परंतू आता त्यांना या ब्रँडनेमचा विचार करण्यास भाग पडले आहे.