लवकरच भारतात येणार Harley-Davidson ची सर्वात स्वस्त 350cc बाइक; किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:08 IST2025-12-16T19:02:06+5:302025-12-16T19:08:53+5:30
Harley-Davidson Bike: सध्या भारतातील 350cc बाइक सेगमेंटमध्ये Royal Enfield Classic 350 चे वर्चस्व आहे.

लवकरच भारतात येणार Harley-Davidson ची सर्वात स्वस्त 350cc बाइक; किंमत फक्त...
Harley-Davidson Bike: जगप्रसिद्ध प्रीमियम बाइक ब्रँड Harley-Davidson भारतात लवकरच 350cc क्षमतेची बाइक लॉन्च करणार आहे. ही बाइक भारतीय बाजारासाठी कंपनीच्या धोरणात मोठा बदल दर्शवणारी ठरू शकते. या सेगमेंटमध्ये सध्या Royal Enfield Classic 350 आघाडीवर असून, हार्लेची नवी बाइक तिला थेट स्पर्धा देणार आहे.
Harley-Davidson चा मोठा बदल
आतापर्यंत मोठ्या इंजिन क्षमतेच्या आणि महागड्या बाइक्ससाठी ओळखली जाणारी Harley-Davidson आता भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन लहान इंजिन आणि किफायतशीर किंमतीच्या बाइक्सकडे वळत आहे. अलीकडेच लॉन्च झालेल्या X440 नंतर कंपनी आता पूर्णपणे नव्या 350cc मॉडेलवर काम करत आहे. जागतिक अहवालांनुसार, ही बाइक 2027 पर्यंत भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
350cc सेगमेंट का आहे महत्त्वाचे?
भारतामध्ये 350cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्सवर कर कमी लागतो, त्यामुळे त्यांची किंमत तुलनेने परवडणारी ठरते. याच कारणामुळे या सेगमेंटमध्ये Royal Enfield Classic 350 गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व गाजवत आहे. कमी कर, चांगले मायलेज आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असल्याने 350cc सेगमेंट भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. Harley-Davidson आता याच संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे.
किंमत आणि लॉन्चबाबत अपेक्षा
कंपनीकडून अद्याप अधिकृत किंमतीची घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ही बाइक सुमारे 2 लाख रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या Royal Enfield Classic 350 ची एक्स-शोरूम किंमत 1.81 लाख ते 2.15 लाख रुपये दरम्यान आहे. Harley-Davidson या किंमत श्रेणीत उतरल्यास या सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
Triumph देखील मैदानात
या सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. Bajaj सोबत भागीदारीत Triumph देखील आपली Bonneville 350 तयार करत आहे. त्यामुळे आगामी काळात Royal Enfield, Harley-Davidson आणि Triumph या दिग्गज कंपन्या 350cc सेगमेंटमध्ये आमनेसामने येणार आहेत. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असून अधिक पर्याय आणि उत्तम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.