जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:29 IST2025-09-23T10:29:02+5:302025-09-23T10:29:02+5:30
Maruti Suziki Car Sale After GST: जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर सर्वत्रच खरेदीची मोठी धूम सुरु झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून जे ग्राहक थांबले होते, जे २२ सप्टेंबरची वाट पाहत होते ते सगळे पहिल्याच दिवशी वाहनांच्या शोरुममध्ये दाखल झाले होते.

जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
जीएसटी कपातीच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने दुपारी ३-४ वाजेपर्यंत देशभरात २५ हजार गाड्या विकण्याचा विक्रम केला आहे. एवढेच नाही तर सायंकाळपर्यंत हा आकडा ३० हजारावर जाण्याची शक्यताही मारुतीचे अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती.
जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर सर्वत्रच खरेदीची मोठी धूम सुरु झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून जे ग्राहक थांबले होते, जे २२ सप्टेंबरची वाट पाहत होते ते सगळे पहिल्याच दिवशी वाहनांच्या शोरुममध्ये दाखल झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुम, दुकानांमध्येही अशीच गर्दी पहायला मिळाली होती. कार, स्कूटर, टीव्ही, एसी, अन्न धान्य आदी सर्वच गोष्टींची तुफान विक्री नोंदविली गेली आहे.
जीएसटी रचनेत गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठी सुधारणा झालेली आहे. अनेकांना दसऱ्याच्या दिवशी नवी कोरी गाडी दारात हवी आहे. यामुळे सोमवारपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. यात मारुतीने मोठा हात मारला आहे. या एकाच दिवशी देशातील शेकडो शोरुममधून मारुतीने २५००० गाड्या विकल्या आहेत. तसेच दिवसभरात ८० हजार हून अधिक विचारणा झाली आहे. यामुळे या महिन्यात २० दिवस सुतकाप्रमाणे गेले असले तरी पुढील ९ दिवस हे मारुतीसाठी पावसासारखे असणार आहेत. मारुती आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक विक्री करण्याची शक्यता आहे.
ह्युंदाईचे सीओओ तरुण गर्ग यांच्यानुसार कंपनीने या दिवशी ११ हजार गाड्या डीलरना पाठविल्या आहेत. ऑनलाईन ईकॉमर्स कंपन्यांचे देखील सेल सोमवारपासून सुरु झाले आहेत. नवरात्र आणि दिवाळीमुळे ही विक्री मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाईनवर किंमतीचा खेळ सुरु आहे, जीएसटी कपात लागू होण्यापूर्वीचीच किंमत आता जीएसटी कपात लागू झाल्यानंतरही दिसत आहे. यामुळे यावर जीएसटी कमी केला की नाही, हे समजायला मार्ग नाही. एमआरपी अव्वाच्या सव्वा दाखवून डिस्काऊंटमध्ये विकत असल्याचे दाखवत असल्याने या लोकांना जीएसटी कपातीनंतरही तीच किंमत मॅनेज करता येत आहे. यामुळे ऑनलाईन खरेदीला जास्त फसवणूक होण्याची शक्यता आहे.