भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:14 IST2025-11-07T14:14:14+5:302025-11-07T14:14:39+5:30
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे.

भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
भारतात वाहनांची विक्री ही महिन्याकाठी मोजली जाते. दर महिन्याला अमूक एवढी वाहने विकली गेली, एवढी रजिस्टर झाली, अशी आकडेवारी येते. परंतू, दिवसाला एक लाख वाहन विक्रीचा वेग तुम्ही कधीच ऐकला नसेल. परंतू, यंदाच्या ऑक्टोबर महिन्याने ते पाहिले आहे. भारतात ४२ दिवसांत ४० लाखांहून अधिक वाहने विकली गेली आहेत.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये ट्रक, टेम्पो, मोठमोठाली वाहने यांचा समावेश नाही.
सणासुदीचा काळ आणि जीएसटी कपात या दोघांच्या मुहूर्ताने ही अशक्यप्राय गोष्ट शक्य केली आहे. हाच वेग पुढे राहणार नाही, परंतू या सणाच्या पार्श्वभूमीवर सरासरी दिवसाला एक लाख वाहने विकली जात होती. सरकारने अचानक जीएसटी दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किमती त्वरित खाली आल्या. यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने शोरूमकडे वळले. दिवाळी, दसरा आणि धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर वाहने खरेदी करण्याची भारतीय ग्राहकांची मानसिकता आणि आकर्षक डील्सचा परिणाम म्हणून विक्रीत मोठी वाढ झाली.
मुख्य आकडेवारी (अंदाजित):
| वाहनाचा प्रकार | विक्री (एकके) | मागील वर्षाच्या तुलनेत वाढ |
| दुचाकी (टू-व्हीलर) | सुमारे ३२ लाख | २०% हून अधिक |
| चारचाकी (फोर-व्हीलर) | सुमारे ८ लाख | १५% च्या आसपास |
| एकूण विक्री | ४० लाखांहून अधिक विक्रमी वाढ |
टू-व्हीलरची कमाल
दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, यात मध्यम-वर्गीयांचा मोठा सहभाग होता. चारचाकींच्या मागणीतही मोठी वाढ झाली असली, तरी चिपच्या तुटवड्यामुळे कंपन्यांना मागणी पूर्ण करता आली नाही.