Maharashtra Budget 2022: वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 07:32 IST2022-03-12T07:31:46+5:302022-03-12T07:32:23+5:30
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ - २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली.

Maharashtra Budget 2022: वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजीच्या व्हॅटमध्ये १०. ५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून रिक्षा टॅक्सी चालक यांना दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ - २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली. नैसर्गिक वायूवर साडेदहा टक्क्यांनी व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्याने पीएनजीही स्वस्त होणार आहे. मात्र पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सरकारने करकपात केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
कोरोना काळात रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सीएनजी दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे सीएनजीचे दरही कमी होतील. त्याचा निश्चितच रिक्षा, टॅक्सी चालकांना फायदा होईल.
- के के तिवारी, मुंबई अध्यक्ष, भाजप टॅक्सी, रिक्षा युनियन