Ford Motors Exit PLI: फोर्डने पुन्हा कच खाल्ली! आधी अर्ज केला, निवड झाल्यावर केंद्राच्या योजनेतून माघार घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:05 IST2022-05-14T13:04:42+5:302022-05-14T13:05:01+5:30
फोर्डचे गुजरात आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये कंपनी भारतासाठी आणि परदेशांत निर्यांत करण्यासाठी कार बनवित होती. गेल्या वर्षी फोर्डने भारतातून एक्झिट घेतली होती.

Ford Motors Exit PLI: फोर्डने पुन्हा कच खाल्ली! आधी अर्ज केला, निवड झाल्यावर केंद्राच्या योजनेतून माघार घेतली
अमेरिकन कार निर्माता कंपनी आणि गेल्या वर्षी भारत सोडण्याची घोषणा करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिलेल्या फोर्डने पुन्हा एकदा कच खाल्ली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या केंद्र सरकारच्या पीएलआय स्कीममध्ये आधी अर्ज केला, नंतर सिलेक्शन झाल्याने कंपनी भारतातील प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रीक कारचे उत्पादन करणार होती. परंतू आता कंपनीने यातूनही एक्झिट घेतली आहे. आता कंपनी दोन्ही प्रकल्पांसाठी गिऱ्हाईक पाहत आहे.
फोर्डचे गुजरात आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये कंपनी भारतासाठी आणि परदेशांत निर्यांत करण्यासाठी कार बनवित होती. परंतू, कंपनीने नुकसान दाखवून अचानक भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतीन उत्पादन बंद करत आधीच्या १० लाख ग्राहकांना सेवा मिळत राहिल असेही आश्वासन दिले आहे. यानंतर गेले काही महिने फोर्डच्या ग्राहकांना सर्व्हिस सेंटरमधून सेवा मिळत आहे.
फोर्डचे नाव पीएलआय स्कीममध्ये आल्याने कंपनी भारतातील आपले अस्तित्व ठेवेल असे वाटत असताना पुन्हा कंपनीने कच खाल्ली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये भारतात ईव्ही कार बनविणार असल्याचे सांगितले होते. यासाठी भारत सरकारच्या ३.५ अब्ज डॉलर्सच्या पीएलआय योजनेची मंजुरीदेखील मिळाली होती. या लिस्टमध्ये मारुतीचे देखील नाव नव्हते. परंतू फोर्डने आपला अर्ज मागे घेतला आहे.
फोर्ड इंडियाने सांगितले की, "काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यानंतर, आम्ही कोणत्याही भारतीय प्लांटमधून निर्यातीसाठी ईव्ही उत्पादन सुरु करण्यासाठी पुढे पावले न टाकण्याचा निर्णय घेतला आहे." गेल्या वर्षी जेव्हा कंपनीने देशातील उत्पादन बंद केले तेव्हा भारतीय प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत तिचा वाटा 2 टक्क्यांपेक्षा कमी होता. भारतीय बाजारपेठेत नफा मिळविण्यासाठी कंपनीने दोन दशकांहून अधिक काळ संघर्ष केला होता. तीन वर्षांपूर्वी कंपनी नफ्यातही आली होती. परंतू पुन्हा कोरोना काळ आणि जागतिक संकटांमुळे कंपनीने भारतातून एक्झिट घेतली आहे.