फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:42 IST2025-10-01T11:40:58+5:302025-10-01T11:42:50+5:30
Ferrari legal disputes, Agnelli Family: इटलीतील अग्नेली कुटुंबात फेरारी आणि स्टेलॅंटिस सारख्या दिग्गज कंपन्यांच्या नियंत्रणासाठी हा वाद आहे. मुलाचा मृत्यू झाल्याने जियानी यांची मुलगी आणि तिच्या मुलामध्ये म्हणजेच जियानी यांच्या नातवामध्ये हा कायदेशीर वाद सुरु आहे.

फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
'फिएटचा राजा' म्हणून ओळखले जाणारे जियानी अग्नेलींच्या २००३ मधील मृत्यूनंतर सुरू झालेला त्यांच्या संपत्ती, कंपन्यांच्या मालकीचा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. कुटुंबाचे प्रमुख जियानी एग्नेली यांच्या हस्ताक्षरातील एक नोट समोर आली आहे. यामध्ये त्यांनी जियाननी एग्नेली यांची होल्डिंग कंपनी 'डिसेम्ब्रे'मधील सुमारे २५% हिस्सेदारी त्यांचा पुत्र एडोआर्डो यांना देण्याचे लिहिले होते. परंतू, त्यांचा जियानी यांच्या तीन वर्षे आधीच मृत्यू झाला होता. यामुळे पुन्हा पेच निर्माण झाला आहे.
इटलीतील अग्नेली कुटुंबात फेरारी आणि स्टेलॅंटिस सारख्या दिग्गज कंपन्यांच्या नियंत्रणासाठी हा वाद आहे. मुलाचा मृत्यू झाल्याने जियानी यांची मुलगी आणि तिच्या मुलामध्ये म्हणजेच जियानी यांच्या नातवामध्ये हा कायदेशीर वाद सुरु आहे. या नव्या चिठ्ठीमुळे कन्या मार्गेरिटा एग्नेली आणि नातू जॉन एल्कॅन यांच्यात वाद सुरु झाला आहे.
एडोआर्डो यांचे २००० साली निधन झाले. मात्र, १९९६ मधील एका दुसऱ्या दस्तऐवजानुसार ही हिस्सेदारी जॉन एल्कॅन यांच्याकडे देण्यात आली होती. मार्गेरिटा यांनी ही नोट सादर करत आपला हिस्सा परत मिळावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, जॉन एल्कॅन यांच्या कायदेशीर टीमचे म्हणणे आहे की, २००४ साली झालेल्या करारानुसारच ते फेरारी आणि स्टेलेंटिसचे अध्यक्ष झाले आहेत आणि तोच करार वैध आहे. हा वाद केवळ पैशांसाठी नसून, फेरारी आणि स्टेलेंटिससारख्या जागतिक ऑटोमोबाइल उद्योगातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या नियंत्रणासाठी आहे, ज्यामुळे या प्रकरणाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. जॉन एल्कान, लोपो आणि जिनेवरा ही तिन्ही मुले मार्गेरिटा यांच्या पहिल्या लग्नापासून झालेली आहेत.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, या नोटेत जियानींनी आपल्या होल्डिंग कंपनीमधील २५% हिस्सा मुलगा एडोआर्डो अग्नेलींना देण्याचे लिहिले होते. मात्र, एडोआर्डोंचा २००० मध्ये मृत्यू झाला. यापूर्वी १९९६ च्या दस्तऐवजात हा हिस्सा जॉन एल्कान (जियानींचा नातू) यांना देण्याचे ठरले होते. २००३ मध्ये मृत्यूपत्र उघडताना फक्त १९९६ चा दस्तऐवज दाखवला गेला, ज्यामुळे जॉन एल्कानला ही संपत्ती मिळाली होती. जियानींच्या पत्नी मारेला कैरासिओलो यांनी नंतर डिसेंबर कंपनीतील २५.३७% हिस्सा जॉन एल्कानला दिला होता. आता मार्गेरिटा यांचा असा दावा आहे की १९९८ ची नोट खरी आहे आणि हा हिस्सा त्यांना आणि मारेला यांना मिळायला हवा होता.
अग्नेली कुटुंबाचा इतिहास: फिएट आणि फेरारीचा संबंध
जियानी अग्नेलींचे आजोबा जियोवानी अग्नेली (१८६६-१९४५) हे फिएटचे सह-संस्थापक होते. १८९९ मध्ये ट्यूरिनमध्ये फिएटची स्थापना करून त्यांनी इटलीला जागतिक कार बाजारात नेले. एनझो फेरारींनी १९३९ मध्ये स्वतंत्र कंपनी सुरू केली, पण १९६९ मध्ये फिएटने फेरारीत ५०% हिस्सा घेतला, ज्यामुळे कंपनीला आर्थिक बळ मिळाले. १९८८ पर्यंत फिएटचा हिस्सा ९०% झाला.
फेरारीच्या मालकीचा वाटा: तीन भागांत विभाग
- एक्सोर एन.व्ही.: अग्नेलींची होल्डिंग कंपनी; २४.६५% इक्विटी आणि ३६.४८% मतदान हक्क.
- पिएरो फेरारी: एनझो फेरारींचे पुत्र; १०.४८% इक्विटी आणि १५.५% मतदान हक्क.
- सार्वजनिक गुंतवणूकदार: उरलेला बहुतांश हिस्सा.