FASTag Traffic Challan : फास्टॅग असला नसला तरी दंडाची पावती घरी येणार; नवा नियम डोकेदुखी वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:31 IST2022-03-28T16:31:13+5:302022-03-28T16:31:51+5:30
FASTag New Rule: हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे.

FASTag Traffic Challan : फास्टॅग असला नसला तरी दंडाची पावती घरी येणार; नवा नियम डोकेदुखी वाढवणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किती जरी टोलनाके हटविणार असल्याचे सांगत असले तरी ते सध्या तरी शक्य नाहीय. यामुळे रांगेत राहूनच टोल देत वाहने हाकावी लागणार आहे. या रांगांपासून मुक्ती मिळण्यासाठी चार वर्षांपूर्वी FASTag प्रणाली वापरात आली व गेल्या वर्षीपासून ती सक्तीची झाली. ज्याच्याकडे फास्टॅग नाही त्याला दुप्पट टोलही आकारण्यात येत आहे. परंतू त्याहूनही मोठा नियम करण्यात आला आहे.
हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे. १५ फेब्रुवारीपासून देशात प्रत्येक चारचाकीसह अन्य मोठ्या वाहनांवर फास्टॅग सक्तीचा करण्यात आला आहे. जरी फास्टॅग लावलेला असला तरी देखील दंडाची पावती फाडली जाण्याची शक्यता आहे.
कारण फास्टॅग काचेवर लावलेला असला तरी तो अॅक्टिव्ह असला पाहिजे. यामुळे आम्ही टोल नाक्यांवरूवन जात नाही, किंवा ज्यांच्यापासून टोलनाके लांब आहेत व संबंधच येत नाही अशा कार, वाहनांवर देखील फास्टॅग लावणे बंधनकारक झालेले आहे. यामुळे जर तुमच्या कारला फास्टॅग लावलेला असेल तर तो आधी सक्रीय केलेला आहे का ते तपासा.
कसे पकडणार...
जर तुम्ही टोल नाक्यावरून गेला आणि जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल किंवा इनअॅक्टिव्ह असेल किंवा पुरेसे पैसे नसतील तर तुमचा वाहतूक पोलिसांचे सीसीटीव्ही काढतात तसा फोटो काढला जाईल. त्याची दंडाची पावती तुम्हाला ऑनलाईन पाठविली जाणार आहे. म्हणजे डबल टोल भरावा लागणार ते वेगळेच आणि वर दंडही आकारला जाणार आहे. यापेक्षा तो फास्टॅग घेतलेला बरा असे वाटू लागणार आहे.