LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:12 IST2020-01-18T13:06:47+5:302020-01-18T13:12:54+5:30
स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार

LoEV इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह हटके फिचर्स
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणारी स्टार्टअप कंपनी BattRE Electric Mobility ने सध्या आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लोईव्ही (LoEV) लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरूवातीची किंमत 59,900 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सहा रंगात उपलब्ध असणार असून LoEV स्कूटरची विक्री कंपनीच्या महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधील शोरूमध्ये केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, LoEVस्कूटर ऑनलाइन मार्केटिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडियावरूनही ग्राहकांना मागवता येणार आहे. स्कूटरमध्ये अत्याधुनिक फिचर्स आणि उपकरणे दिली आहेत. LoEV स्कूटरमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, रिमोट की, अॅन्टीथेफ्ट अलॉर्म, रिव्हर्स गिअर, व्हील इमोबिलायजर यांसारथे फीचर्स असणार आहेत. तसेच, स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 90 किलोमीटरचे अंतर कापू शकते.
याचबरोबर, या स्कूटरमध्ये 10 एमपीअरची फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे स्कूटरची बॅटरी फक्त दोन तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. तसेच, स्कूटरमध्ये काढता येईल अशी लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे कुठेही बॅटरी चार्ज करण्याची सुविधा मिळते. याशिवाय, बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच, स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, टेल लाइट, टर्न इंडिकेटर आणि डीआरएल लाइट दिले आहेत. मध्ये एलईडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले जाते. यामुळे स्कूटरचे मायलेज, बॅटरी, स्पीड यासंबंधी माहिती मिळते.
दरम्यान, कंपनीने गेल्या वर्षी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी-वनला लॉन्च केले होते. कंपनी भारतात एन्ट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे. ज्यामुळे ग्राहकांनी फायदेशीर ठरेल आणि सोबत अनेक फीचर्स मिळतील. कंपनीने दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा डिलरशीप सुरू करण्याची योजना तयार करत आहे. BattRE Electric Mobility ची स्थापना 2017 मध्ये जयपूरमध्ये करण्यात आली होती.