टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:28 IST2025-12-12T12:28:23+5:302025-12-12T12:28:42+5:30
Elon Musk Tesla Sales Down: टेस्लाच्या जागतिक विक्रीत ४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण. एलन मस्कचे स्वस्त Model Y, Model 3 बाजारात अपयशी. भारतातही ॲागस्टपासून फक्त १५७ युनिट्सची विक्री.

टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी 'टेस्ला' सध्या विक्रीच्या बाबतीत मोठ्या संकटातून जात आहे. टेस्लाची जागतिक विक्री कमालीची घटली असून, अमेरिकेत विक्रीचा आकडा गेल्या चार वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाने आपले लोकप्रिय मॉडेल्स – Model 3 आणि Model Y – चे सर्वात स्वस्त 'स्टँडर्ड' व्हेरियंट अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये आणि भारतातही लाँच केले. तरीही कंपनीला मागणीतील मोठी घसरण थांबवता आलेली नाही. कॉक्स ऑटोमोटिव्हच्या अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यात टेस्लाची विक्री अमेरिकेत सुमारे २३% ने घसरून ३९,८०० युनिट्सवर आली, जो जानेवारी २०२२ नंतरचा सर्वात कमी आकडा आहे.
सवलतीचा परिणाम नाही
$५,००० पर्यंत स्वस्त असलेले 'स्टँडर्ड' व्हेरियंट लाँच करूनही ही घसरण झाली आहे. सप्टेंबरमध्ये $७,५०० चा फेडरल टॅक्स क्रेडिट (सरकारी सूट) संपल्यानंतर मागणी कमी झाली आहे. विश्लेषकांच्या मते, स्वस्त मॉडेल्समुळे मागणी वाढण्याऐवजी, प्रीमियम मॉडेल्सच्या विक्रीवर (विशेषतः Model 3 वर) नकारात्मक परिणाम झाला आहे.
भारतातही निराशाजनक चित्र
लक्झरी इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात जोरदार एन्ट्रीची अपेक्षा असलेल्या टेस्लाला भारतातही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सरकारी वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, टेस्लाने सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या तीन महिन्यांत भारतात फक्त १५७ युनिट्सची विक्री केली आहे. नोव्हेंबरमध्ये टेस्लाची विक्री ४८ युनिट्स इतकी होती, तर याच महिन्यात BMW ने २६७ इलेक्ट्रिक कार्स विकल्या. यावरून टेस्लाला सध्याच्या लक्झरी ब्रँड्सकडून मोठी स्पर्धा मिळत असल्याचे स्पष्ट होते.