लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार!

By अमेय गोगटे | Published: May 29, 2022 03:16 PM2022-05-29T15:16:35+5:302022-05-29T15:17:25+5:30

'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं.

Electric Vehicle pros and cons, comparison with petrol diesel vehicles battery life, maintenance, running cost etc | लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार!

लेखः इलेक्ट्रिक व्हेईकल घ्यायचा करताय का विचार?... जरा करो इंतजार!

Next

>> अमेय गोगटे

एसीचा सुखद गारवा... भीमसेनी कापराचा मंद सुगंध... कुठलाही आवाज न करता धावणारी कार... प्रशस्त आणि अगदी हायटेक...
मयुरेशच्या इलेक्ट्रिक व्हेईकलमधून घरी जाताना अनिरुद्ध - म्हणजे आमचा 'अन्या' एका वेगळ्याच धुंदीत होता. 'यावेळी पगारवाढीनंतर घेऊनच टाकतो कार', असा पक्का इरादा त्याने केला होता. रोज नवनव्या गाड्या 'सर्च' करणाऱ्या अन्याला या इलेक्ट्रिक कारने भुरळ घातली. "अरे, १ रुपया १ किलोमीटर! अजून काय हवं"; हे मयुरेशचे बोल त्याच्या कानात रुंजी घालत होते.

कारमधून उतरताच त्याने फोन केला. 'ठरलं रे भावा.. कार ठरली आपली..' मी 'हॅलो'ही म्हणायच्या आत अन्यानं घोषणा केली. 'नाक्यावर भेट', असं फर्मानही सोडलं. आता अन्याच्या डोक्यात नेमकी कुठली कार शिरली असेल, याचे अंदाज बांधत मी नाक्यावर पोहोचलो, तेव्हा तो 'फुल्ल चार्ज' होता. 'डन डना डन, इलेक्ट्रिक कार फायनल', शेक हँड करत त्याने चहाचा ग्लास माझ्या हातात दिला, तेव्हा माझ्या एका हाताला चटका आणि एका हाताला 'शॉक' बसला. अन्याच्या अंगातला 'इलेक्ट्रिक करंट' स्पष्ट जाणवला. 'इलेक्ट्रिक कारचे फायदे' या विषयावर अन्या न थांबता, न थकता बोलत राहिला, मी होकारार्थी मान डोलवत ऐकत राहिलो. उद्या जरा शांतपणे बोलू, असं म्हणून मी निघालो आणि आमच्या ऑफिसमधल्या 'इलॉन मस्क'ला - म्हणजेच हेमंताला फोन केला. त्याने किश्श्यांमधून इलेक्ट्रिक व्हेईकलचे फायदे-तोटे सांगितले. ते अन्यासाठी टिपून ठेवले. त्यातलेच काही ठळक मुद्दे, इव्ही घेण्याचा विचार करणाऱ्या मित्रांसाठी...

+ इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा सर्वात महत्त्वाचा उद्देश पर्यावरण रक्षण. पेट्रोल, डिझेल गाड्यांमधून होणारं कार्बन उत्सर्जन, पर्यायाने प्रदूषण रोखण्यासाठी वीजेवर चालणाऱ्या गाड्यांना सरकार प्रोत्साहन देतंय. इलेक्ट्रिक कार/बाईकसाठी सरकारकडून सबसिडी दिली जाते, इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज घेतल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते.

- पण, या गाड्यांची किंमत पाहता, पर्यावरण रक्षण मध्यमवर्गीयांच्या खिशाला महागात पडू शकतं. अद्ययावत इलेक्ट्रिक कारची किंमत १५ लाखांच्या पुढे आहे. उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती साधारणपणे ७-८ लाखांची कार घेते. त्यात आणखी ७-८ लाख वाढवणं म्हणजे व्याजही वाढणार. इन्शूरन्स वाढणार. मग, इथे जो पैसा जाणार आहे, तेवढा इंधनावर आपण वाचवू शकणार आहोत का, हा विचार करायला हवा.
 
+  'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. डिझेल कारने शहरात ट्रॅव्हल करत असू तर प्रती किलोमीटर सात-आठ रुपये इंधन खर्च येतो. याउलट, इलेक्ट्रिक कारची रनिंग कॉस्ट दीड-दोन रुपये पडते.

- पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. १५ दिवसांतून एखाददा कुटुंबासोबत कुठेतरी जवळपास जाऊन यायचं म्हणून किंवा वर्षातून दोन वेळा गावी जायचं म्हणून कार घेत असाल, तर 'रनिंग कॉस्ट' कमी करून तुम्ही फार बचत करू शकाल असं वाटत नाही.

+ इलेक्ट्रिक कार मेन्टेनन्सवर येणारा खर्च तुलनेनं कमी आहे, याबाबत दुमत असायचं कारणच नाही. कारण, पेट्रोल-डिझेल-सीएनजी कारमध्ये मेकॅनिकल इंजिन असतं. म्हणजे, ठरावीक काळाने त्याला तेल-पाणी करणं आलं. इथे बॅटरी हाच प्राण आहे आणि साधारण आठ वर्ष बॅटरी चालत असल्याचा दावा कंपन्या करत आहेत.

- पण, इंजिन मेंटेन्ससचा खर्च सोडला, तर टायर बदलावे लागणं, सीट कव्हर खराब होणं, खरचटणं, उंदीरमामाचे उपद्व्याप, यापासून इलेक्ट्रिक वाहनंही सुटलेली नाहीत. तसंच, बॅटरी चार्ज करणं हे एक मोठं टास्क आहे. तुम्ही सोसायटीत कितव्या मजल्यावर राहता, वरचा मजला असेल तर पार्किंगमध्ये चार्जर बसवता येईल का, त्यासाठी किती खर्च करावा लागेल, सोसायटीची परवानगी वगैरे गोष्टींचा विचार करायला हवा. बाहेरगावी जाणार असाल तर आपल्या कारची रेंज किती, त्या मार्गावर चार्जिंग स्टेशन आहेत का, कुठे आहेत, चार्जिंगला किती वेळ लागेल, कारमधलं वजन किती, घाट वगैरे आहे का, रेंज कमी तर होणार नाही ना, आपली बॅटरी किती पुरेल, बाहेर चार्जिंगसाठी येणारा खर्च आणि वेळ हे सगळी गोळाबेरीज करावी लागेल.

थोडं थांबा!

+ इलेक्ट्रिक व्हेईकल घेणं आज आर्थिक आणि इतरही कारणांमुळे आवाक्याबाहेरचं आही. पण इव्ही हे भविष्य आहे आणि ते नक्कीच उज्ज्वल असेल. कारण, अनेक भारतीय उद्योगसमूह लिथियम बॅटरी आपल्याच देशात तयार करण्याची आखणी करताहेत. स्वाभाविकच, या बॅटरीज् आणि पर्यायाने इव्ही स्वस्त होतील. चार्जिंग स्टेशनची संख्या वाढेल, फास्ट चार्जिंग, सोलार चार्जिंग असे पर्याय उपलब्ध होतील आणि आपला इलेक्ट्रिक व्हेईकलमधील प्रवास आणखी स्वस्त आणि मस्त होईल, हे नक्की!

जो नियम इलेक्ट्रिक कारला, तोच इलेक्ट्रिक स्कूटरलाही लागू होतो. आज पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे स्कूटरची रेंज, आपला वापर, चार्जिंगची व्यवस्था, बॅटरीची काळजी, इंधनावरचा सध्याचा खर्च हा सगळा हिशेब मांडूनच दुप्पट खर्च करायचा की नाही, हे ठरवणं चांगलं!

(लेखक लोकमत डॉट कॉम वेबसाईटचे संपादक आहेत.)

Web Title: Electric Vehicle pros and cons, comparison with petrol diesel vehicles battery life, maintenance, running cost etc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.