आता मद्यपान करून वाहन चालवता येणार नाही, ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाजणार अलार्म!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 11:49 IST2022-09-22T11:46:42+5:302022-09-22T11:49:33+5:30
Drink and Drive : बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षाही होऊ शकते.

आता मद्यपान करून वाहन चालवता येणार नाही, ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाजणार अलार्म!
नवी दिल्ली : मद्यपान करून वाहन चालवणे हे जगभरातील रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षाही होऊ शकते. असे असूनही मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण कमी होत नाही.
पण जर तुमची कार स्वतःच तुम्हाला ड्रायव्हिंग करण्यापासून थांबवत असेल तर? ...होय. असे होऊ शकते. कारण, अमेरिकेत अशा एका टेक्नॉलॉजीवर काम सुरू आहे, ज्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरची माहिती मिळणार आहे. या टेक्नॉलॉजीला अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम, असे नाव देण्यात आले आहे. ही टेक्नॉलॉजी थेट वाहनांमध्ये इन्स्टॉल केली जाणार आहे.
अशाप्रकारे काम करू शकते टेक्नॉलॉजी
मद्यपान व्यक्ती शोधण्याची टेक्नॉलॉजी अनेक प्रकारे कार्य करते. या टेक्नॉलॉजीद्वारे ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर सतत नजर ठेवली जाते. ड्रायव्हरला अलर्ट ठेवण्यासाठी ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम जशी काम करते, त्याच पद्धतीने ही टेक्नॉलॉजी काम करते. ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवायला बसला तर लगेच अलार्म वाजू लागतो. मात्र, ही टेक्नॉलॉजी अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही. यावर सातत्याने काम सुरू आहे.
अनेकांचे प्राण वाचवता येतील
अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने (NTSB)कार निर्मात्यांना असे सेफ्टी फीचर्स सर्व वाहनांमध्ये स्टँडर्डपणे देण्यास सांगितले आहे. अशा आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे अनेक अपघात टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचवता येतील, असा नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचा विश्वास आहे.
भारतात दरवर्षी हजारो लोकांचा होतो मृत्यू
अमेरिकेत 2020 मध्ये मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे 11,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. भारताविषयी बोलायचे झाले तर, येथे मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे दरवर्षी जवळपास 8,300 लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा दारूच्या नशेत वाहनचालक स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याचे दिसून येते. यादरम्यान त्याला कारवर नियंत्रण ठेवता येत नाही. वेग, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे आणि यादृच्छिकपणे उलटणे ही अपघातांची काही कारणे आहेत.