Alto ऐवजी ग्राहकांची Maruti च्या 'या' कारला पसंती; विक्रीत १७९ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 13:32 IST2021-07-27T13:26:46+5:302021-07-27T13:32:10+5:30
Maruti Suzuki India : भारतीय बाजारपेठेत पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये आहे मारूती सुझुकीचं वर्चस्व. मारूती ऑल्टो ठरली होती बेस्ट सेलिंग कार.

Alto ऐवजी ग्राहकांची Maruti च्या 'या' कारला पसंती; विक्रीत १७९ टक्क्यांची वाढ
भारतीय बाजारपेठेत पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये मारूती सुझुकीचं वर्चस्व आहे. अनेक दशकांपासून मारूतीच्या कार्स आपल्या परवडणाऱ्या किंमती आणि मायलेजसाठी ओळखल्या जातात. मोठ्या कालावधीपासन मारूती ऑल्टो (Maruti Alto) ही बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. परंतु गेल्या जून महिन्यात कंपनीची टॉल बॉय म्हणून ओळखली जाणारी वॅगन-आर ही बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.
कारच्या विक्रीबाबत सांगायचं झालं तर गेल्या जून महिन्यात कंपनीनं WagonR च्या 19,447 युनिट्सची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या 6,972 युनिट्सच्या तुलनेत 179 टक्के अधिक आहे. तर दुसरीकडे मारूती ऑल्टोबद्दल सांगायचं झाल्यास कंपनीनं या कारच्या 12,513 युनिट्सची विक्री केली. जी गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या 7,298 युनिट्सच्या तुलनेत अधिक आहे.
Maruti WagonR ही भारतीय बाजारपेठेत पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरिअंटमध्येही उपलब्ध आहे. टॉल बॉय बॉक्सी डिझाईनमुळे या कारच्या केबिनमध्ये उत्तम स्पेस आणि लेगरूम मिळते. ही कार दोन निराळ्या पेट्रोल इंजिनसह येते. एक व्हेरिअंट 1.0 लीटर पेट्रोल इंजिन (68PS/90Nm) देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन (83PS/113Nm) देण्यात आलं आहे.
किंमत आणि मायलेज
याच्या 1.0 लीटर व्हेरिअंटचं मायलेज 21.79 किलोमीटर प्रति लीटर आणि 1.2 लीटर व्हेरिअंटचं मायलेज 20.52 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजी व्हेरिअंटचं मायलेज 32 किलोमीटर प्रति किलोग्राम इतकं आहे. या कारची किंमत 4.80 लाखांपासून 6.33 लाख रूपयांच्या दरम्यान आहे.