जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:17 IST2025-12-25T12:16:44+5:302025-12-25T12:17:41+5:30
Car Price Hike January 2026 : एकंदरीतच सर्वच वस्तू स्वस्त झाल्याने काहीशी स्वस्ताई सर्वच क्षेत्रांत आली होती. परंतू, हा दिलासा मिळून दोन महिने होत नाहीत तोच कार कंपन्यांनी उत्पादन खर्च वाढल्याचे कारण देत कारच्या किंमती वाढविण्याची तयारी सुरु केली आहे.

जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
नवीन वर्षात नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे २०२५ च्या सुरुवातीलाच देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ऑडी यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी आधीच किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
ऑक्टोबरमध्ये नवरात्रामध्ये केंद्र सरकारने बहुतांश वस्तूंवरील जीएसटी घटविला होता. यामध्ये ४ मीटरच्या आतील कारही होत्या. तसेच मोठ्या कारही होत्या. एकंदरीतच सर्वच वस्तू स्वस्त झाल्याने काहीशी स्वस्ताई सर्वच क्षेत्रांत आली होती. परंतू, हा दिलासा मिळून दोन महिने होत नाहीत तोच कार कंपन्यांनी उत्पादन खर्च वाढल्याचे कारण देत कारच्या किंमती वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून या नव्या किंमती लागू केल्या जाणार आहेत. यामागे नेहमीचीच कारणे आहेत. मग जीएसटी कमी झाल्याचा फायदा कार कंपन्यांना नाही झाला का असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
कार उत्पादक कंपन्या दरवर्षी जानेवारीत दरवाढ करण्यामागे काही ठराविक तांत्रिक आणि आर्थिक कारणे असतात. कार बनवण्यासाठी लागणारे पोलाद, प्लास्टिक, रबर आणि इतर सुट्या भागांच्या किमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या ग्राहकांवर बोजा टाकतात. सरकार वेळोवेळी प्रदूषणाचे नियम कडक करत असते. या नियमांनुसार इंजिनमध्ये बदल करणे आणि नवीन तंत्रज्ञान बसवणे यासाठी कंपन्यांना मोठा खर्च करावा लागतो. डिसेंबर महिन्यात जुना स्टॉक संपवण्यासाठी कंपन्या मोठ्या सवलती देतात. मात्र, नवीन वर्षात (२०२५ मॉडेल) उत्पादन खर्च पुन्हा शून्यापासून मोजला जातो, ज्यामुळे जानेवारीत सवलती बंद होऊन किमती वाढतात. वाढती महागाई आणि रुपयाचे डॉलरच्या तुलनेत होणारे मूल्य यामुळे आयात केलेल्या भागांचा खर्च वाढतो, ज्याचा परिणाम थेट कारच्या किमतीवर होतो.
कोणत्या कंपन्या वाढवणार भाव?
मारुती सुझुकीने आधीच स्पष्ट केले आहे की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे ते आपल्या गाड्यांचे दर वाढवणार आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा देखील आपल्या एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांच्या किमतीत १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमजीने देखील घोषणा केलेली आहे.