JSW EV Incentive Policy: औद्योगिक घराण्याचे मोठे पाऊल! इलेक्ट्रीक कारसाठी कर्मचाऱ्यांना देणार तीन लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:56 IST2021-12-28T15:55:53+5:302021-12-28T15:56:17+5:30
JSW EV Incentive Policy: जवळपास १४० देशांमध्ये पसरलेल्या देशातील बड्या औद्योगिक घराण्याने आज स्तुत्य पाऊल उचलले आहे. कंपनीने १ जानेवारीपासून ही स्कीम सुरु केली आहे.

JSW EV Incentive Policy: औद्योगिक घराण्याचे मोठे पाऊल! इलेक्ट्रीक कारसाठी कर्मचाऱ्यांना देणार तीन लाख रुपये
जवळपास १४० देशांमध्ये पसरलेल्या देशातील बड्या औद्योगिक घराण्याने आज स्तुत्य पाऊल उचलले आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी हा ग्रुप इलेक्ट्रीक कार विकत घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपये देणार आहे. कंपनीने १ जानेवारीपासून ही स्कीम सुरु केली आहे.
JSW उद्योग समुहाने ही घोषणा केली आहे. भारतातील त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही इन्सेंटिव्ह स्कीम लागू करण्यात आली आहे. जेएसड्ब्लू इलेक्ट्रीक स्कूटक आणि कार या दोन्हींसाठी इन्सेंटिव्ह देणार आहे. एवढेच नाही तर कंपनीची कार्यालये, प्रकल्पांच्या आवारात ही वाहने मोफत चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन आणि पार्किंग स्ल़ॉटदेखील उपलब्ध केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रीक वाहने घ्यावीत आणि पर्यावरण वाचवावे हा यामागचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगोच्या COP26 बैठकीत भारत २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचा प्रयत्न करेल अशी घोषणा केली होती. जेएसडब्ल्यूने यामुळेच ही ईव्ही नीती लागू केली आहे. हे आमच्या समुहाने त्यादिशेने उचललेले पहिले पाऊल आहे, असे जेएसड्ब्लू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी म्हटले आहे.