सर्व टू-व्हीलर ब्रँड्सचा बँड वाजणार? Activa Electric स्कूटर लॉन्चबाबत आली मोठी माहिती, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:56 IST2023-03-20T16:55:23+5:302023-03-20T16:56:08+5:30
भारतीय बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लवकरच मोठा धक्का होंडा कंपनी देणार आहे.

सर्व टू-व्हीलर ब्रँड्सचा बँड वाजणार? Activa Electric स्कूटर लॉन्चबाबत आली मोठी माहिती, वाचा...
नवी दिल्ली-
भारतीय बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लवकरच मोठा धक्का होंडा कंपनी देणार आहे. देशात अनेक इलेक्ट्रिक स्टार्टअप ब्रँड्स आणि कंपन्या सध्या चांगली कामगिरी करत आहेत. पण आता देशात टू-व्हीलर स्कूटरमध्ये दबदबा असलेल्या होंडानंही आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. येत्या २९ मार्च रोजी होंडा कंपनी Activa Electric स्कूटर लॉन्च करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एक प्रेजंटेशन लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यानुसार कंपनी याच महिन्यात Activa Electric स्कूटरची घोषणा करणार आहे. याचवेळी स्कूटरचे डिटेल्स देखील जाहीर केले जातील असा अंदाज आहे. नुकतंच कंपनीनं Activa Smart लॉन्चच्या इव्हेंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरबाबतचा अंदाज दिला होता. कंपनी मार्च २०२४ पर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं कंपनीचे अधिकारी अत्सुशी ओगाटा यांनी म्हटलं होतं. सध्याच्या होंडा Activa सारखीच इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर बॅटरी पॅकसह उपलब्ध होणार आहे. स्कूटरची टॉप स्पीड जवळपास ५० किमी प्रतितास इतकी असणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार Activa Electric जागतिक पातळीवर लॉन्च केली जाणार आहे. एकाचवेळी आशिया, युरोप आणि जपानच्या बाजारात ही स्कूटर लॉन्च होईल. Activa हे नाव कंपनीसाठी खूप मोठं आहे आणि नावाला साजेशी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचं आव्हान कंपनीसमोर आहे. त्यामुळे या स्कूटरबाबत ग्राहकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.