जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:37 IST2025-10-01T12:35:16+5:302025-10-01T12:37:35+5:30
Auto sector September 2025 Sale After GST Reforms: जीएसटी कपात आणि सणांमुळे ऑटो क्षेत्रात बंपर विक्री! मारुती, महिंद्रासह इतर कंपन्यांनीही केली रेकॉर्डब्रेक विक्री. जाणून घ्या कोणत्या कंपनीने किती युनिट्स विकले.

जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
जीएसटी कपात आणि सणांचा उत्साह यामुळे ऑटोमोबाइल उद्योगात विक्रीचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. वाहन कंपन्यांसाठी हा काळ मोठा 'सुकाळ' ठरला असून, एकाच महिन्यात विक्रीने मोठी उसळी घेतली आहे. जीएसटी कपातीने दिलेली सूट आणि सणांमधील खरेदीचा उत्साह याचा थेट फायदा ग्राहकांना झाला, ज्यामुळे मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांनी दोन लाखांच्या विक्री आकड्याला गवसणी घालण्याचा पराक्रम केला आहे.
ऑटो कंपन्यांची दिवाळी:
मारुती सुझुकी: विक्रीत अभूतपूर्व वाढ नोंदवत मारुतीने तब्बल १,९७,५०० युनिट्सची विक्री केली आहे. ही विक्री २ लाखांच्या आकड्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे, जे या कंपनीसाठी एक मोठा टप्पा आहे.
महिंद्रा: महिंद्राने विक्रीत ४३.१५ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली असून, एकूण ५६,४०० युनिट्स विकले आहेत. ही वाढ कंपनीसाठी दिलासादायक ठरली आहे.
ह्युंदाई मोटर्स: कंपनीच्या विक्रीत १०% वाढ झाली असून त्यांनी ७०,३४७ युनिट्सची विक्री केली.
टोयोटा आणि एमजी मोटर्स: टोयोटाने १६% वाढीसह ३१,०९१ युनिट्स विकले, तर जेएसडब्ल्यू एमजी मोटरच्या विक्रीत ३४% वाढ होऊन हा आकडा ६,७२८ युनिट्सवर पोहोचला आहे.
टाटा मोटर्स: देशांतर्गत आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सला मात्र या संधीचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. त्यांची विक्री ४५,९०० युनिट्सपर्यंतच मर्यादित राहिली.
दुचाकी बाजारातील जोरदार वाढ:
टीव्हीएस मोटर्स: दुचाकी विक्रीत टीव्हीएसने सर्वाधिक ५६ टक्क्यांची वाढ नोंदवत ५.३३ लाख युनिट्स विकले.
बजाज ऑटो: बजाजने २१ टक्क्यांची वाढ नोंदवत ४.१५ लाख युनिट्सची विक्री केली.
हिरो मोटोकॉर्प: हिरो मोटोकॉर्पने ६.७७ लाख युनिट्स विकून आपला दबदबा कायम राखला.
रॉयल एनफिल्ड: रॉयल एनफिल्डच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून त्यांनी १.३३ लाख युनिट्स विकले.