ऑटो इंडस्ट्रीमध्ये जूनमध्ये हाहाकार उडाला आहे. मारुती, ह्युंदाईसह टाटाच्या वाहनविक्रीत मोठी घसरण झाली आहे. एकट्या महिंद्राने काय तो किल्ला लढविला आहे. मारुती, टाटा, ह्युंदाई या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांची विक्री थोडी थोडकी नाही तर १३-१५ टक्क्यांनी घसरली आहे. चीनने रेअर अर्थ मेटल रोखल्याने जुलै देखील या कंपन्यांसाठी संकटाचाच असणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच कंपन्या सुरु राहू शकतात असे ऑटो इंडस्ट्रीने जाहीर केले होते. यामुळे ऐन सनासुदीचा काळ ऑटो कंपन्यांसाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठा फटका टाटा मोटर्सला बसला आहे. लाख-दोन लाख डिस्काऊंट देऊनही टाटाला कार खपविता आलेल्या नाहीत. सेकंड हँड कार मार्केटमध्ये देखील टाटाच्या नव्या कोऱ्या कार, नंबर न पडलेल्या म्हणजेच तुम्हीच फर्स्ट ओनर अशा मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. टाटाची इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री जूनमध्ये १५ टक्क्यांनी घसरून ३७,०८३ युनिट्सवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने एकूण ४३,५२४ वाहने विकली होती.
ह्युंदाई मोटर इंडियाची विक्रीही १२ टक्क्यांनी घसरून ४४,०२४ युनिट्सवर आली. जून २०२४ मध्ये एकूण ५०,१०३ वाहने विकली होती. याचबरोबर देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारुतीलाही मोठा झटका बसला आहे. मारुतीने जूनमध्ये १,१८,९०६ वाहने विकली. तर गेल्या वर्षी याच महिन्यात १,३७,१६० वाहने विकली होती. मारुतीच्या ताफ्यात एक फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगची कार येऊनही कंपनीला फारसा फायदा झालेला दिसत नाही.
महिंद्रा, टोयोटा अन् एमजीने मात्र वादळात झेंडा फडकत ठेवला...
या घसरणीच्या वादळात मारुती, टाटा, ह्युंदाईचा तंबू उखडला गेला असला तरी महिंद्राने मात्र आपला झेंडा फडकवत ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या जूनपेक्षा महिंद्राने ७००० वाहने जास्त विकली आहेत. यंदाच्या जूनमध्ये महिंद्राने ४७,३०६ वाहने विकली आहेत. हा आकडा तब्बल १८ टक्क्यांनी जास्त आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वाहन विक्रीत देखील पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोयोटाने २८,८६९ युनिट्स विकल्या आहेत. तसेच एमजी मोटर्सने देखील विक्रीत वाढ नोंदविली आहे. या जूनमध्ये कंपनीच्या कारची विक्री २१ टक्क्यांनी वाढून ५,८२९ युनिट्स झाली आहे.