पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:59 IST2025-11-12T14:57:16+5:302025-11-12T14:59:21+5:30
एअरबॅग रायडरची छाती, पाठीचा कणा, आणि मान या महत्वाच्या भागांचे संरक्षण करणार आहे. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांच्या मृत्यूंपैकी सुमारे ७०% मृत्यू हे याच अवयवांवरील दुखापतींमुळे होतात.

पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
देशातील वाढलेल्या अपघातांच्या आकड्यात सर्वाधिक मोठा वाटा हा दुचाकीस्वारांचा असतो. हेल्मेट आजही बरेचजण घालत नाहीत. तसेच शरीराच्या वरच्या भागाला दुखापत झाल्याने दगावण्याचे प्रमाणही मोठे आहे. यापासून वाचण्यासाठी इंडो-फ्रेंच संयुक्त उपक्रम असलेल्या निओकवचने भारतातील पहिले 'इंटेलिजेंट वेअरेबल एअरबॅग सिस्टीम' असलेले निओकवच एअर वेस्ट जॅकेट लाँच केले आहे. कारमध्ये जशी एअरबॅग असते तशीच एअरबॅग आता दुचाकीस्वारांचा जीव वाचविणार आहे.
NeoKavach एअर वेस्ट एखाद्या क्रॅश किंवा अचानक खाली पडण्याच्या स्थितीत फक्त १०० मिलीसेकंदांपेक्षा कमी वेळात कार्यान्वित होते, असा कंपनीचा दावा आहे. रायडरची छाती, पाठीचा कणा, आणि मान या महत्वाच्या भागांचे संरक्षण करणार आहे. अपघातग्रस्त दुचाकीस्वारांच्या मृत्यूंपैकी सुमारे ७०% मृत्यू हे याच अवयवांवरील दुखापतींमुळे होतात.
या जॅकेटची एअरबॅग उघडण्यासाठी बॅटरी नाही तर टेथर ट्रिगर सिस्टीम वापरण्यात आली आहे. ही सिस्टीम अपघात झाल्याचे कळताच आपोआप सुरु होणार असून एअरबॅग उघडली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे ही एअरबॅग एकदा उघडली की ती पुन्हा फोल्ड करून पुन्हा वापरता येणारी आहे. म्हणजेच गाडी घसरली, तोल जाऊन पडला आणि जर ही एअर बॅग उघडली तर ती वाया जाणार नाही. तर तुम्हाला ती रिसेट करून पुन्हा वापरता येणार आहे.
या एअरबॅगची किंमत किती आहे...
| उत्पादन (Product) | वैशिष्ट्ये (Features) | किंमत (Price) |
| NeoKavach Air Vest | छाती, मान, पाठीचा कणा संरक्षण, रिसेट सुविधा | ₹ 32,400 |
| NeoKavach Tech Backpack Pro | एअरबॅग सुरक्षा + स्टोरेज बॅकपॅक | ₹ 40,800 |
| NeoKavach TechPack Air | हलके बॅकपॅक, उत्तम बॅक प्रोटेक्शन | ₹ 36,000 |