इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:12 IST2025-08-14T15:11:43+5:302025-08-14T15:12:05+5:30
Biofuel mix Diesel: उसाच्या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ लागले आहेत. इथेनॉलचा वापर इंधनात केला नसता तर ७५ टक्के साखर उद्योग संपला असता, असा दावा गडकरी यांनी केला आहे.

इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
देशभरात सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण केल्याने होत असलेल्या दुष्परिणामांचा मुद्दा गाजत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्येही १० टक्के बायोफ्युअल मिक्स करणार असल्याची घोषणा करून टाकली आहे. यामुळे आता डिझेल वाहनांच्या प्रेमींमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्यासाठी डिझेलमध्ये १० टक्के आयसोब्यूटानॉल मिसळण्याचा विचार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलेशनचे लक्ष्य यशस्वी साध्य केल्यानंतर आता डिझेलमध्ये बायो इंधन मिसळण्याचे पाऊल ऊर्जा आणि कृषी क्षेत्राला नवीन दिशा देणारे ठरेल असे गड़करी म्हणाले.
आयसोब्युटेनॉलवर संशोधन, विकास आणि मानके निश्चित करण्याचे काम सुरू सध्या सुरु आहे. ते पूर्ण झाले की हा प्रस्ताव पंतप्रधान आणि मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे, असे ते म्हणाले. भारतात डिझेलचा वापर हा पेट्रोलच्या दुप्पटीहून जास्त आहे. यामुळे इंधन मिश्रण योजनेत डिझेलचा समावेश करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
भारतात आता तांदूळ, गहू, ऊस आणि मक्याचे अतिरिक्त उत्पादन होते. या अतिरिक्त उत्पादनाचे जैवइंधनात रूपांतर केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. मक्याचे बाजारभाव तिप्पट वाढले आहेत. बिहारसारख्या राज्यात लागवड क्षेत्रही यामुळे वाढल्याचे गडकरी म्हणाले. उसाच्या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ लागले आहेत. इथेनॉलचा वापर इंधनात केला नसता तर ७५ टक्के साखर उद्योग संपला असता, असा दावा गडकरी यांनी केला आहे.