पंकजा मुंडेंकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:06 PM2020-01-28T12:06:56+5:302020-01-28T12:10:40+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आमच्या मागण्या टाळणार नाहीत, उलट मदतीची भूमिका घेतील, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुतीही केली.

Uddhav Thackeray praises Pankaja Munde | पंकजा मुंडेंकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

पंकजा मुंडेंकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी

औरंगाबाद : राज्य शासनाला सत्तेत येऊन १०० दिवस झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात नाही, तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करीत आहे. या उपोषणाच्या माध्यमातून आमच्या सरकारने सुुरू केलेल्या विविध योजनांना अधिक गती देण्यात यावी, मराठवाड्याच्या प्रश्नासाठी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मागणी भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आमच्या मागण्या टाळणार नाहीत, उलट मदतीची भूमिका घेतील, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुतीही केली.

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही सुरू केलेल्या योजनांना स्थगिती देऊ नका, आज लाक्षणिक उपोषण करीत आहोत. उद्या रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी परळीजवळील गोपीनाथगडावर केलेल्या घोषणेनुसार सोमवारी (दि.२७) विभागीय आयुक्तालयासमोर भाजप, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. याच जागेवर २०१३ साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उपोषण केले होते.  या उपोषणाची सांगता करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली हे उपोषण करीत असून, भाजपने यात सक्रिय सहभाग घेत आंदोलन यशस्वी करण्यास हातभार लावला. मराठवाड्यासाठी पाणी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सोडविला पाहिजे. आम्ही सत्तेत असताना अनेक योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांना निधी कमी पडू नये, यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील. आमच्या शासनाने औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी ३२ हजार कोटी रुपये दिले. त्यातून काही प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांना अधिक निधी मिळाला पाहिजे. 
या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे. मराठवाड्याचा पाणी प्रश्न, वॉटरग्रीडला निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शासन आम्हाला रस्त्यावर उतरू देणार नाही, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला. 

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या उपोषणाची दुपारी ४ वाजता त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीताने सांगता झाली. ....  मुलीच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.  या उपोषणाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री महादेव जानकर, खासदार प्रीतम मुंडे, मराठवाड्यातील आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, सुरेश धस, नारायण कुचे, लक्ष्मण पवार, सुरजितसिंह ठाकूर, तानाजी मुटकुळे, संतोष दानवे, अभिमन्यू पवार, मेघना बोर्डीकर, लातूर जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, किसान मोर्चाचे भाई ज्ञानोबा मुंडे, रमेश आडसकर यांच्यासह भाजपचे मराठवाड्यातील माजी आमदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, जनादेश नसणारे शासन सत्तेत आल्यामुळे हा संघर्ष करावा लागत आहे. तो अधिक तीव्र करू. यावेळी दरेकर,  जानकर, आ. धस, ठाकूर आदींची भाषणे झाली.

आमच्यापेक्षा चांगले काम करील
आगळवेगळे शासन सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यामुळे नुकत्याच आलेल्या शासनाच्या विरोधात हे आंदोलन असणार नाही. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. या शासनाला माझ्या शुभेच्छाच आहेत. आमच्यापेक्षाही हे शासन चांगले काम करून जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

आज उपोषण,उद्या रस्त्यावर उतरू -फडणवीस 
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमच्या शासनाने ७ टीएमसीच नव्हे तर २९ टीएमसी पाण्याचे नियोजन केले. गोदावरीचा जलआराखडा तयार करून मंजूर केला. वॉटरग्रिडच्या माध्यमातून ६० हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी दिली. या कामांसाठी शासनाने निधी द्यावा, स्थगिती देऊ नये. स्थगिती देण्याचा प्रयत्न केला तर आज उपोषण करीत आहोत, उद्या रस्त्यावर उतरू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Web Title: Uddhav Thackeray praises Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.