औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:28 PM2020-11-21T13:28:25+5:302020-11-21T13:29:57+5:30

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे.

Two and a half thousand vehicles sold on Diwali in Aurangabad | औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन  ४००  चारचाकी, २००० दुचाकी रस्त्यावर

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद :  यंदाचा दसरा-दिवाळी सण वाहन उद्योगासाठी संजीवनी ठरला. दिवाळीतील मुहूर्तावर नवीन ४०० कार व २००० दुचाकी विक्री झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झाली आहे. 

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे. दिवाळी संपली तरी हा वेग कायम आहे. कारण, कार विक्रीत अजूनही महिना, दोन महिन्यांची वेटिंग सुरू आहे.  सर्व कंपन्याच्या मिळून ४०० कार व २००० दुचाकींची विक्री झाली.  कार उपलब्ध असत्या तर  या दिवाळीत ७०० कार विक्री झाल्या असत्या, असा दावा कार वितरकांनी केला आहे. नवरात्र ते दसऱ्यादरम्यान ४८०० दुचाकी व ७०० कार विक्री झाल्या होत्या. शहरात विविध कंपन्यांच्या सुमारे ४ ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यातील ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण ७० टक्के होते. ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी मिळत आहेत. त्यातील ५० ते ७० हजारांदरम्यानच्या दुचाकी विक्रीचे प्रमाण ७० टक्के आहे.

सणामुळे वाहन बाजाराला गती 
कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मर्यादा आल्या आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी स्वतःच्या वाहनतच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाली. दसरा- दिवाळीनिमित्त वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून प्रचीती आली. 
-राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज आटोमोबाईल 

ग्रामीण भागातून दुचाकीला मागणी
गतवर्षी बाजारात आर्थिक मंदी होती. त्यामुळे बाजारात उलाढालदेखील समाधानकारक झाली नव्हती. त्यातच यंदा कोरोनाचे संकट आल्याने बाजारात तसा उत्साह नव्हता. याचा दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम होईल, असे वाटले होते; पण शहराप्रमाणे ग्रामीण भागातून  मोठ्या प्रमाणात दुचाकी विक्री झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे यंदा ग्रामीण भागातून दुचाकीला मागणी वाढली आहे.
- दीपक झुणझुणवाला, दुचाकी वितरक

मी हॉस्पिटलमध्ये काम करते. माझे घर व हॉस्पिटलमध्ये ५ कि.मी.चे अंतर आहे. मी पूर्वी शेअरिंग रिक्षात प्रवास करत असे; पण कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी मी स्वतःची दुचाकी खरेदी केली. 
-प्रियंका देशमुख, दुचाकी ग्राहक, उल्कानगरी

सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रणच. यामुळे मी स्वतःची कार खरेदी केली आहे. वाळूज परिसरात कंपनीत जाताना किंवा कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कारद्वारे सुरक्षित प्रवास करता येत आहे.  
-प्रसन्न दहीभाते, ग्राहक, ज्योतीनगर
 

Web Title: Two and a half thousand vehicles sold on Diwali in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.