एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:35 PM2019-02-12T12:35:50+5:302019-02-12T12:37:41+5:30

त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तक्रार केली.

ST driver's irresponsible and defamatory behavior with foreign tourists | एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

googlenewsNext
ठळक मुद्दे एसटी बसचालकाची पर्यटकांसोबत अरेरावी

- ऋचिका पालोदकर 

औरंगाबाद : वेरूळ लेणीत एस. टी. महामंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बसच्या बेजबाबदार कारभारामुळे आणि बसचालकाने परिस्थिती समजून न घेता पर्यटकांवर केलेल्या अरेरावीमुळे अ‍ॅन आणि आर्थर या दोन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन एस. टी. चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तसेच या बसच्या गैरसुविधेबाबत तक्रार केली.

अ‍ॅन आणि आर्थर सोमवारी वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेणी क्र. १६ येथून पुढे जाण्यासाठी ते बसची वाट पाहत होते. एस. टी. महामंडळाच्या दोन बस याठिकाणी उपलब्ध असून, दोन्ही बसमधील चालक त्याच वेळी एकत्र जेवणासाठी बसले. जेवणासाठी अजून एक तास लागेल, असे चालकांनी सांगितले. पण अ‍ॅन आणि आर्थर यांना लवकरात लवकर औरंगाबादला यायचे होते. त्यामुळे अधिक वाट न पाहता ते लेणी क्र. ३२ पर्यंत पायी गेले.

ते तेथे पोहोचल्यावर साधारण १ तासानंतर इतर पर्यटकांना सोडण्यासाठी बस आली. उन्हामुळे आणि वयोमानानुसार अ‍ॅन यांना त्रास व्हायला लागला आणि पुन्हा पायी चालत जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी परतीचा प्रवास बसने करू द्यावा अशी बसचालकाला विनंती केली. यावर बसचालकाने तिकीट नसल्यामुळे तुम्हाला नेऊ शकत नाही, असे उत्तर दिले. अ‍ॅन आणि आर्थर यांचे गाईड पंकज कवडे यांनीही लेणी क्र. १६  येथे गेल्यावर तिकीट काढतो, पण कृपया अ‍ॅन यांना त्रास होत असल्यामुळे तरी त्यांना बसने येऊ द्यावे, असे चालकाला विनविले. पण यावर चालकाने काय करायचे ते करा, पण मी तुम्हाला नेणार नाही, असे बजावले.

शेवटी कवडे यांनी वेरूळच्या पुरातत्व खात्याशी संपर्क साधून पर्यटकांची अडचण कळविली. यानंतर  पुरातत्व विभागाच्या एक कर्मचाऱ्याने लेणी क्र .१६ येथून तिकीट काढून क्र . ३२ येथे घेऊन गेले आणि त्यानंतर परदेशी पर्यटकांना बसने येता आले. या परिस्थितीमुळे वैतागलेल्या पर्यटकांनी पुरातत्व विभागाला भेट देऊन या गैरसोयीबद्दल लेखी तक्रार दिली. 

दोन्ही ठिकाणी तिकीट मिळावे
बस अत्यंत असुविधाजनक आहेत. अनेकदा एकच कंडक्टर कामावर असतो. सहा वाजता शेवटची बस सुटेल असा नियम आहे. पण त्यापूर्वीच चालक पलायन करतात. सकाळच्या वेळेत तर बऱ्याचदा बस उपलब्धच नसते. लेणी क्र. १६ येथूनच बस मिळते. लेणी क्र. ३२ येथूनही परतीचे तिकीट मिळण्याबाबत महामंडळाला वारंवार सांगण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. दोन्ही बसचे चालक एकाच वेळी जेवायला बसतात. त्यामुळे पर्यटका खोळंबून राहतात. 

पर्यटकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष 
बसच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे पर्यटकांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. तासन्तास खोळंबून राहावे लागले. निदान अ‍ॅन आणि आर्थर यांचे वय आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून सहकार्य अपेक्षित होते. पुरातत्व विभाग आणि इतर पर्यटकांकडून या बसविषयी एस.टी. महामंडळाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत, पण त्याकडे ते दुर्लक्ष करतात. या अप्रिय घटनेमुळे पर्यटक आपल्या शहराची अत्यंत चुकीची प्रतिमा घेऊन गेले. - पंकज कवडे, गाईड

Web Title: ST driver's irresponsible and defamatory behavior with foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.