ठळक मुद्देवडील किडनी विकाराने आजारी तर आई धुणीभांडी करतेचार मुली आणि एका मुलाच्या सुरक्षेचा प्रश्न होता
औरंगाबाद: पोट भरणेच अवघड, त्यात कुणी भाड्याने घरही देत नसल्यामुळे क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली गेल्या तीन-चार महिन्यांपासून आईवडिलांसह राहणाऱ्या बेघर अल्पवयीन ५ बहीण-भावंडांना क्रांतीचौक पोलिसांनी सुरक्षित निवारा मिळवून देत गुरुवारी त्यांची रवानगी बालसंगोपनगृहात केली.
क्रांतीचौक पुलाखाली रमेश सोनवणे (वय ७०) हे पत्नी, दीड ते १२ वर्षे वयाच्या ४ मुली आणि ४ वर्षाच्या मुलासह राहतात. लॉकडाऊनपूर्वी हे कुटुंब कामाच्या शोधात औरंगाबादेत आले. सिल्लेखाना भागात ते भाड्याच्या खोलीत राहत होते. लॉकडाऊनमध्ये त्यांना ही खोली सोडावी लागली व तेव्हापासून हे कुटुंब उड्डाणपुलाखालीच राहते.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल यांच्या नजरेस हे कुटुंब पडले. पुलाखाली उघड्यावर असे राहणे बालक आणि मुलींच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी आम्ही घर भाड्याने शोधत आहोत, मात्र घर मिळत नसल्याचे सांगितले. बालकांची आई धुणीभांडी व एका मेसमध्ये पोळ्या लाटते. तर वडील रमेश दामोदर सोनवणे (रा. लखीमपूर, जिल्हा जळगाव) त्यांच्यासोबत थांबतात. सोनवणे हे देखिल आजारी असून त्यांच्या किडन्या निकामी झाल्या आहेत. आजारपण आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने हतबल झालेल्या या कुटुंबाची मोठी परवड होत होती.
मुस्कान मोहिमेअंतर्गत मिळाला निवारा
पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक बागुल यांनी गुरुवारी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सुनील गायकवाड, कैलास पंडित, अन्नपूर्णा ढोरे यांना सोबत घेऊन सोनवणे कुटुंबातील ४ मुली आणि एक मुलगा यांना मुस्कान मोहिमेअंतर्गत बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने सर्व परिस्थितीचा विचार करून या बालकांना बालसंगोपनगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
Web Title: The soft side of the police ! Saw the affordability of a homeless family; Arranged a shelter for five siblings in Aurangabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.