प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सची २० टक्के भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 12:17 PM2021-10-20T12:17:57+5:302021-10-20T12:25:18+5:30

यंदाही भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांचे म्हणणे आहे.

Scissors in passenger pockets; Travels fair hike by 20% on Diwali background | प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सची २० टक्के भाडेवाढ

प्रवाशांच्या खिशाला कात्री; दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सची २० टक्के भाडेवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद-नागपूर, मुंबईचे भाडे १ हजार तर लातूरसाठी मोजवे लागणार ६०० रुपये

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्सचालकांनी २५ ऑक्टोबरपासून २० टक्के भाडेवाढ ( Travels fair hike by 20% ) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नागपूरसाठी सध्या ट्रॅव्हल्सला ८०० रुपये भाडे आकारले जाते. मात्र, दिवाळीत नागपूरच्या प्रवासासाठी १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. अशीच भाडेवाढीची स्थिती इतर शहरांसाठीही आहे. त्यातही ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना यापेक्षा अधिक भाडे मोजण्याची वेळ ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ होते. गेल्या काही महिन्यांत डिझेल दर वाढले आहेत. त्यामुळे यंदाही भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांचे म्हणणे आहे. दिवाळीसाठी विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र, अशा शहरातून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे भाडेवाढ करावी लागत असल्याचेही सांगण्यात आले.

वर्षभर नुकसानच
दोन वर्षांनंतरची दिवाळी चांगली व्हावी, अशी ट्रॅव्हल्सचालकांची अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांत डिझेलचे दर वाढले आहेत. भाडे वाढविले, तर प्रवासी मिळत नाहीत. भाडे कमी केले, तर आर्थिक नूकसान होते. कोरोनामुळे वर्षभर नुकसानच झाले. लाॅकडाऊन काळात वाहतूकदारांच्या नुकसानीबाबत काहीतरी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कर माफ व्हावा, ही अपेक्षा आहे, असे बस ओनर आणि ट्रॅव्हल्स एजंट वेलफेअर असोसिएशनचे राजन हौजवाला यांनी सांगितले.

प्रवाशांच्या खिशाला झळ; सामान्यांचा विचार करावा
कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामाेरे जावे लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. वेतन कपात झाली. कामे मिळणे अवघड होत आहे. अशा परिस्थिती सगळ्याच क्षेत्रात दरवाढ होत आहे. ट्रॅव्हल्सची भाडेवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार केला पाहिजे.
- अभिनव पिंपळे

प्रवासी आणखी दूर जातील
कोरोनामुळे अनेक जण आधीच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांतून प्रवास टाळण्यावर भर देत आहेत. आता भाडेवाढ केल्यास ट्रॅव्हल्सकडे जाणारा प्रवासी आणखी दूर जातील. त्यामुळे भाडे कसे कमी राहतील, यावर भर दिला पाहिजे.
- धनंजय जाधव

ट्रॅव्हल्सचे दर : आधीचे --- दिवाळीत (रुपयांत)
औरंगाबाद ते मुंबई- ८००------१०००
औरंगाबाद ते नागपूर- ८००------१०००
औरंगाबाद ते पुणे- ४५० -------५००
औरंगाबाद ते सोलापूर- ४५० ------५५०
औरंगाबाद ते लातूर- ५०० -------६००

Web Title: Scissors in passenger pockets; Travels fair hike by 20% on Diwali background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.