‘राजतडाग’ ते औरंगाबाद व्हाया खडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:51 AM2019-11-22T02:51:14+5:302019-11-22T02:52:51+5:30

औरंगाबाद जिल्हा बुद्धकाळापासून इतिहासात प्रसिद्ध

'Rajdag' to Aurangabad via Khadki | ‘राजतडाग’ ते औरंगाबाद व्हाया खडकी

‘राजतडाग’ ते औरंगाबाद व्हाया खडकी

googlenewsNext

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा इतिहास ४०० वर्षांचा नसून तो जवळपास दीड हजार वर्ष जुना आहे. हे शहर प्राचीन काळातही समृद्ध होते. औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा, वेरूळ आदी प्राचीन स्थानांबरोबरच हे शहरही विकसित होत गेले. बुद्धकाळात हे नगर राजतडाग या नावाने ओळखले जात होते. भारतातील प्राचीन व्यापारी महामार्गावर वसलेल्या या वैभवशाली नगरीला बौद्धसंस्कृतीचा मोठा इतिहास आहे. राजतडाग ते औरंगाबाद व्हाया खडकी असा या शहराचा रंजक इतिहास आहे.

औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन राजाच्या काळापर्यंत मागे आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, मोगल आणि निजाम यांच्या राजवटी या भूमीवर नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर असा मिलाफ झालेला आढळतो. सातवाहनाच्या काळात खामनदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेकडील डोंगर रांगात बुद्धलेणी व बुद्धविहारे तयार करण्यात आली, नंतरच्या शतकांमध्ये या गावाचा उल्लेख राजतडाग म्हणून आढळतो.

सातवाहन कालखंडात खामनदीवर खडकी गावात राजतडाग नावाचा मोठा जलाशय निर्माण केला होता. त्याचे लहान रूप आपणास ‘हरिशूल’ नावाच्या तलावाच्या रूपाने पाहावयास मिळते. राजतडाग विशाल होता. त्याच्या तिरावर सध्याचे शासकीय रुग्णालय आहे. या शहराला औरंगाबाद हे नाव १७ व्या शतकात औरंगजेब बादशहाच्या नावावरून पडले असले तरी औरंगाबादचे मूळ नाव ‘राजतडाग’ असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. मुंबईच्या कान्हेरी येथील सातवाहनकालीन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडागचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजतडाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्त्वाचा थांबा होता. सार्थवाह पथ म्हणजेच व्यापारी मार्ग होय. प्रतिष्ठान (पैठण) वरून उज्जैन, श्रावस्ती येथे प्रवास करणारे अनेक प्रवासी तांडे या मुक्कामास थांबत असत. त्यांची मुक्कामाची सोय करण्याच्या दृष्टीने सातवाहनराजांनी राजतडागची निर्मिती केली होती. आजचा हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय, असे मानले जाते.

अशी झाली नामांतरे...
सातव्या शतकातील राजतडागनंतर हे शहर पुढे खडकी नावाने ओळखले जाऊ लागले. निजामशाहीचा वजीर मलिक अंबरने हे शहर जिंकले व १६१० मध्ये दौलताबादवरून तत्कालीन खडकीला राजधानी हलविली. मलिक अंबरचा उत्तराधिकारी फतेह खान याने सन १६२९ मध्ये या शहराचे नामकरण फतेहपूर असे केले. हे फतेहपूर नंतर दिल्लीच्या मोगल बादशाह शाहजहानने जिंकून मोगल साम्राज्यात सामील केले. शाहजहानचा मुलगा औरंगजेब दोनदा या प्रदेशाचा सुभेदार झाला व त्याने सन १६५३ मध्ये फतेहपूर नाव बदलून औरंगाबाद असे ठेवले.

‘वर्षावास’साठी लेणी ते विहारे...
इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. मराठवाड्यात इ.स. पूर्व पहिल्या शतकात प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला. औरंगाबाद शहरालगतच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील औरंगाबाद बौद्ध लेणी सहाव्या ते सातव्या शतकात खोदली गेली. दीड किलो मीटरच्या डोंगरात एकूण १२ लेण्या कोरल्या आहेत.

12 लेण्यांपैकी लेणी क्रमांक ४ हे एकच चैत्यगृह असून उर्वरित ११ लेण्या विहारे आहेत. या लेण्यांमध्ये नागराज,नागराणी, बोधिसत्व, पद्मपाणी, वज्रपाणी, यक्ष आणि ध्यानस्थ बुद्ध मूर्ती, हत्ती, घोडे व सिंह कोरले आहेत. या लेण्यांचा शोध १९६१ मध्ये लागला. या परिसरात बौद्ध संस्कृती नांदत असल्याचे पुरावे असे सहाव्या, सातव्या शतकापर्यंत मागे आढळतात. एकाच जिल्ह्यामध्ये युनोस्कोचा सर्वाधिक वारसा लाभलेला देशातील औरंगाबाद हा एकमेव जिल्हा आहे.

1545 भारतातील एकूण लेणी
1200 पुरातत्त्व खात्याकडे नोंदी
800 महाराष्ट्रात एकूण लेणी
132 मराठवाड्यात एकूण लेणी

औरंगाबाद जिल्ह्यात- औरंगाबादची बौद्ध लेणी, पितळखोरा लेणी, लोहगड लेणी, अजिंठा व वेरूळ लेणी.

Web Title: 'Rajdag' to Aurangabad via Khadki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.