Pre-Civil Service Examination on 4th October | नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी

नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी

औरंगाबाद : संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९: ३० ते ११: ३० या वेळेत तर दुसरे सत्र दु. १४: ३० ते १६: ३० या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा औरंगाबाद शहरातील ३२ उपकेंद्रावर होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले.

या परीक्षेसाठी ११,४२९ उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहे. या परीक्षेच्या कामासाठी १६२३ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने आयोगाने दिलेले प्रवेश प्रमाणपत्र तसेच पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स, ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षा कक्षामध्ये पहिल्या सत्रासाठी सकाळी ९: २० नंतर तर दुसऱ्या सत्रासाठी १४:२० वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मास्क सॅनिटायझर बॉटल, पिण्याचे पाण्याची बॉटल , मनगटी काटयाची घडयाळ ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमदेवारास परवानगी नाही.

 उमेदवाराने त्याच्या सोबत परीक्षा कक्षात डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्युटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य नेऊ नये. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता संघ लोकसेवा आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असून परीक्षेचे जिल्हा समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले.

Web Title: Pre-Civil Service Examination on 4th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.