तिसऱ्या लाटेत नवी चिंता; एकदा होऊन गेला म्हणजे कोरोनाचे भय इथे संपले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 04:46 PM2022-01-17T16:46:38+5:302022-01-17T16:49:38+5:30

तिसऱ्या लाटेत आता दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा पाॅझिटिव्ह होण्याची भीती

New anxiety in the third wave; Once done, Corona's fears did not end there | तिसऱ्या लाटेत नवी चिंता; एकदा होऊन गेला म्हणजे कोरोनाचे भय इथे संपले नाही

तिसऱ्या लाटेत नवी चिंता; एकदा होऊन गेला म्हणजे कोरोनाचे भय इथे संपले नाही

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे झालं...आपण कायमस्वरुपी कोरोनापासून सुटलो, या भ्रमात अनेक जण राहत आहेत. परंतु एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे कोरोनाचे भय संपत नाही. कारण अनेकांना दुसऱ्यांदा कोरोना गाठत आहे. तिसऱ्या लाटेत दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा कोरोना पाॅझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे रुग्णात प्रतिकारशक्ती तयार होते. मात्र, काहींच्या बाबतीत या अँटिबॉडीजही निरुपयोगी ठरत असून, या व्यक्ती दुसऱ्यांदा कोरोनाबाधित होत आहेत. या विषाणूचा संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता असली तरी एक दिलासादायक बाब म्हणजे दुसऱ्यांदा पुन्हा संसर्ग झाला तरी तो गंभीर असण्याची शक्यता कमी असते

दुसऱ्यांदा पाॅझिटिव्ह ?
महापालिकेकडे दुसऱ्यांदा पाॅझिटिव्ह झालेल्या ३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. मात्र, अनेक जण आधी बाधित झाल्याची माहिती देत नाहीत. तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या पाहता ही संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रमाण वाढण्याची भीती
कोरोना दुसऱ्यांदाही होऊ शकतो. गेले काही महिने त्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता त्याचे प्रमाण वाढण्याची भीती नाकारता येत नाही. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर माॅनिटरिंग केले जात आहे. त्यांचा फाॅलोअप घेतला जात आहे.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

कुणाला २ महिन्यांत, कोणाला ९ महिन्यांत पुन्हा कोरोना
बीड बायपास परिसरातील ४९ वर्षीय व्यक्ती १२ ऑगस्ट २०२० रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आली होती. कोरोनामुक्त होऊन ती घरी गेली. मात्र, दुसऱ्या लाटेत १९ मे २०२१ रोजी त्यांना कोरोनाने पुन्हा गाठले. दुसऱ्यांदा कोरोना होणारे ते काही एकमेव नाहीत, तर कुणाला २ महिन्यांत तर कोणाला ९ महिन्यांत काहींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली.

यांनाही झाला दुसऱ्यांदा कोरोना
माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा कोरोना झाला. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुनील टिंगरे यांना नूकतीच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. याबरोबरच इतरही काही लोकप्रतिनिधी, नेत्यांना कोरोनाने दुसऱ्यांदा गाठले. औरंगाबादेतील काही अधिकाऱ्यांनाही दुसऱ्यांदा कोरोना झाला.
 

Web Title: New anxiety in the third wave; Once done, Corona's fears did not end there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.