५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 01:47 PM2021-06-05T13:47:42+5:302021-06-05T13:53:31+5:30

आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत

mastermind arrested for Rs 56 lakh online scam from Bihar | ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक

५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रीयन एसपीची झाली मदत गॅस एजन्सी मंजूर झाल्याची मारली होती थाप

औरंगाबाद : वाळूज महानगरामधील व्यावसायिकाला भारत गॅस कंपनीची गॅस एजन्सी मंजूर झाल्याची थाप मारून त्यांची ५६ लाख ६५ हजार ७०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला सायबर पोलिसांनी बिहारमधील त्याच्या गावातून पकडून आणले. आरोपीच्या चार साथीदारांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेशमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे अनेक गुन्हे नोंद असून, या राज्यांतील पोलिसांना हे वॉण्टेड गुन्हेगार आहेत. नितीशकुमार जितेंद्रसिंग प्रसाद (२४, रा. हाथीयारी, जि. नवादा, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.

वाळूज महानगरामधील चांगदेव सोमनाथ तांदळे यांनी २०२० मध्ये गॅस एजन्सी मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या कंपनीकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज नामंजूर झाला होता. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी त्यांना आरोपी नितीशकुमार प्रसादने बीपीसीएल कंपनीचा अधिकारी बोलत असल्याची थाप मारून त्यांना गॅस एजन्सी मंजूर झाल्याचे सांगितले. यानंतर त्याने त्यांना बनावट कागदपत्रे पाठवून तांदळे यांचा विश्वास संपादित केला आणि १ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२० या कालावधीत त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ५६ लाख ६५ हजार ७०० रुपये ऑनलाइन वेगवेगळ्या बॅंक खात्यात भरायला लावले. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर सायबर ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे आणि त्यांच्या ठाण्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी तांत्रिक तपास करून चार आरोपींना गतवर्षी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड नितीशकुमार असल्याचे निष्पन्न झाले. तो मात्र औरंगाबाद पोलिसांना सारखा चकवा देत होता. त्याला पकडण्यासाठी सायबर पोलिसांची टीम अनेकदा बिहारला गेली. मात्र स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते.

एस.पी. धुरत यांचे मोलाचे सहकार्य
नवादा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी महाराष्ट्रातील रहिवासी सायली धुरत या रुजू झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक बागवडे यांनी त्यांच्याशी संपर्क करून या गुन्ह्यातील आरोपी नितीशकुमार याला पकडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यानंतर सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांचे पथक चार दिवसांपूर्वी बिहारला गेले आणि त्यांनी एस.पी. धुरत यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाने स्थानिक पोलिसांनी केलेल्या मदतीने अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले. स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने शुक्रवारी आरोपीला घेऊन पोलीस शहरात पोहोचले. या कारवाईसाठी पोलीस हवालदार विवेक औटी, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के, कृष्णा आणि छाया लांडगे यांनी सहभाग घेतला.

आरोपींविरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे
आरोपी नितीशकुमारविरुद्ध औरंगाबाद सायबर ठाण्यात ५६ लाख ६५ हजार ७०० रुपयांच्या फसवणुकीचा, तर नवी दिल्ली येथे नऊ लाख ७४ हजार रुपये ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. बंगळुरू येथील ठाण्यात दहा लाख २९ हजार रुपयांची फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. अन्य एक गुन्हा विशाखापट्टणम येथे असल्याचे समोर आले.

Web Title: mastermind arrested for Rs 56 lakh online scam from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.