लकी अलीच्या नव्या व्हिडिओनं चाहत्यांना लावलं याड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:09+5:302021-01-13T04:09:09+5:30
अभिनेता आणि गायक लकी अली जादुई स्वरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या सुप्रसिद्ध ‘ओ सनम’ या गाण्याचे ‘लेस्ट ...

लकी अलीच्या नव्या व्हिडिओनं चाहत्यांना लावलं याड
अभिनेता आणि गायक लकी अली जादुई स्वरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या सुप्रसिद्ध ‘ओ सनम’ या गाण्याचे ‘लेस्ट लकी अली’ व्हर्जन पुन्हा व्हायरल झाले आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजारांवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आमिर अलीने ९ जानेवारी रोजी हा व्हिडिओ शेअर केला. ‘माझे ऑल टाइम फेवरेट लकी अली. अलीकडे लकी अलीची भेट झाली. नि:शब्द झालो. फक्त पाहा आणि या सुंदर गाण्याचा आस्वाद घ्या,’ असे हा व्हिडिओ शेअर करताना आमिर अलीने लिहिले आहे. यापूर्वी डिसेंबरमध्येही लकी अलीचा गोव्यातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अभिनेत्री नफिसा अली यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता.
मकडी गर्लचा झाला जबरदस्त मेकओव्हर
अभिनेत्री श्वेता बासूने ‘कहानी घर घर की’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती ‘मकडी’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. श्वेता ॲक्टिंग करिअरपेक्षा खासगी आयुष्यातच वादग्रस्त राहिली. एका घटनेने तिच्या संपूर्ण करिअरलाच पूर्णविराम मिळाला होता. दरम्यान, २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. त्यानंतर रोहित मित्तलसोबत लग्नाला वर्षच उलटले असताना घटस्फोट झाला. मात्र, यानंतर श्वेताने सर्व विसरून मुक्त आणि स्वच्छंदी आयुष्य जगण्याचे ठरविले असल्याचे तिच्या सोशल मीडियातील पोस्टमधून दिसते. श्वेताचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करील अशीच आहे. या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
म्हणून हनिमूनला जाऊ शकला नाही अली अब्बास जफर
यश राज फिल्म्समध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अली अब्बास जफरची गणना आज बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच अली अब्बास जाफर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याची पत्नी एक फ्रेंच मॉडेल असून, तिचे नाव अलिशिया आहे. अलिशियासोबत माझी ओळख ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मात्र, लग्नानंतर अली अब्बास जफर हनिमूनला जाण्याऐवजी त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला दिसत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्ससाठी बनवीत आहे. फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत याचे शूटिंग सुरू राहणार आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनुसार याच कारणामुळे तो हनिमूनला जाऊ शकला नाही.