दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 03:58 PM2019-08-16T15:58:58+5:302019-08-16T16:08:20+5:30

राजाने मारले, निसर्गाने फटकारले

The last breath of the 13th-century Kewadaban near Doulatabad in Aurangabad | दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

दौलताबाद किल्ल्यामागचे १३ व्या शतकातील केवडाबन मोजतय अंतिम घटका

googlenewsNext
ठळक मुद्देकेवड्याचा उसना गंध घेण्याची येणार वेळ...केवडा मोजतोय अंतिम घटका 

- प्रशांत तेलवाडकर 
औरंगाबाद : केवडा... नाव घेतले तरी सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत असल्याचा भास न होणारा व्यक्ती निरळाच. म्हणूनच या केवड्याने पार देवापासून सर्वसामान्यांच्या मनाची एक कुप्पी आपल्यासाठी राखूनच ठेवली आहे. महाराष्ट्रीयन मनातील सुगंधाची ही कुप्पी भरली जायची माळीवाड्यातील (ता. जि. औरंगाबाद) केवड्याने. परंतु राजाने मारले व निसर्गाने फटकारल्याने माळीवाड्यातील या केवड्याचा सुगंध लोप पावतो आहे. यंदा तर श्रावण सुरू होऊन आठवडा उलटला पण अजूनही झाडावर केवडा दिसत नसल्याने घोर आणखीनच वाढला आहे.गणेशोत्सवाला सुरुवात होताच बाजारात काटेरी हिरव्या पातीमध्ये पिवळाधमक केवडा दिसायला लागतो. गणराया व महालक्ष्मी यांना केवडा प्रिय. नेमका याच काळात केवडा बाजारात येतो. मात्र, यंदा केवड्याच्या घमघमाटाला मुकण्याची वेळ आली आहे.  

दौलताबाद किल्ल्यामागे माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. १३ व्या शतकापासून आपल्या सुवासाची किमया राखून असलेले हे केवडाबन आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. गावातील नागझरी नदीकाठावरील ७ एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. पूर्वी येथे १५ ते २० हजार केवड्यांची झाडे होती. १९७२ च्या दुष्काळाने या बनावर पहिला घाव घातला. त्यात अनेक झाडे वाळली. पुढे नदीतील रसायनयुक्त पाण्यानेही गळचेपी सुरू केली.  शेतकरी रमेश आसवार सांगतात की, ‘‘आजघडीला नागझरी नदीच्या केवळ ४ कि.मी.च्या काठावरच ५ ते ७ हजार झाडे उरली आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे या पुलाचा विस्तार झाला व रुंदीकरणात केवडाबनातील १०० पेक्षा अधिक झाडे तोडावी लागली. जी झाडे शिल्लक आहेत ती पाणी कमी पडल्याने वाळत आहेत. केवड्यास उसापेक्षाही जास्त पाणी लागते. पाणी कमी पडले तर झाडांची पाने पिवळी पडायला लागतात. दरवर्षी श्रावण महिन्यात केवडा येण्यास सुरुवात होते, पण अजूनही झाडावर केवडा दिसत नाही.’’ 

देवगिरीत १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी माळीवाड्यातील बनातील केवड्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जात असे. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनसबन, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे व ठाण्याजवळील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे केवडाबन आहे.


दुसऱ्या ठिकाणी आलाच नाही केवडा 
मागील वर्षी चालू विद्युत तार पडल्याने आमच्या शेतातील २५ पेक्षा अधिक केवड्यांची झाडे जळून नष्ट झाली. आम्ही केवडा दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, पण तेथे झाडे आलीच नाही. ज्या ठिकाणची झाडे जळाली त्याच ठिकाणी पुन्हा केवडा लावला, पण झाड मोठे होण्यास व केवडा येण्यास १० वर्षे लागतील.
-अमोल मुळे, शेतकरी, माळीवाडा
 

Web Title: The last breath of the 13th-century Kewadaban near Doulatabad in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.