Interviews of aspirants from Marathwada conducted by Shiv Sena | शिवसेनेने घेतल्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती

शिवसेनेने घेतल्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती

ठळक मुद्देविद्यमानांना बोलावले नाही इच्छुक शिवसेना भवन परिसरात 

औरंगाबाद : विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेने मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी दिवसभर मुंबईतील शिवसेना भवन येथे घेतल्या. विभागातील ४६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. काही जागांसाठी प्रतिसाद मिळाला तर काही जागांवर उमेदवार शोधावा लागेल, अशी परिस्थिती रविवारी समोर आली. 

२०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर ३ जागा इतर पक्षांतील आमदारांनी प्रवेश केल्यामुळे वाढल्या. भाजपसोबत युती झाल्यानंतर मराठवाड्यातील किती जागा शिवसेनेच्या पदरात पडणार हे अद्याप ठरलेले नाही. परंतु सर्व जागांसाठी मुलाखती घेऊन पक्ष ताकदीचा आढावा आज घेण्यात आला. मराठवाड्यानंतर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

रविवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. जालन्यातील ५ आणि औरंगाबादेतील ९, अशा १४ जागांसाठी मुलाखती झाल्या. उर्वरित जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरातून पूर्व मतदारसंघातून विधानसभा संघटक राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी यांनी, पश्चिममधून माजी नगरसेवक बन्सीलाल गांगवे, नगरसेवक मनोज गांगवे यांनी, मध्य मतदारसंघातून माजी आ.प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, सुहास दाशरथे, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ आदींनी मुलाखती दिल्या. औरंगाबाद ग्रामीणमधून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, संतोष माने, दिनेश मुथा, वैजापूरमधून प्रा.रमेश बोरणारे, आसाराम रोेटे, प्रकाश चव्हाण यांनी, सिल्लोड, पैठण, पश्चिम मतदारसंघांतून विद्यमान आमदार मुलाखतीसाठी आले नाहीत. कन्नडमधून उदयसिंह राजपूत, डॉ.अण्णा शिंदे यांनी तर फुलंब्रीतून विधानसभा संघटक बाबासाहेब डांगे, रमेश पवार, जिजा कोरडे आदींनी मुलाखती दिल्या.

प्रती इच्छुक तीन हजार
प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेला पास मुलाखत देण्यासाठी गेलेल्या इच्छुकांकडे होता. प्रत्येक इच्छुकाला सदस्यत्व शुल्कापोटी १ हजार आणि मुलाखती शुल्क २ हजार असे तीन हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. १० ते १२ मिनिटे प्रत्येकासाठी मिळाले.

विद्यमानांना बोलावले नाही 
पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान आ.संजय शिरसाट, पैठणचे आ.संदीपान भुमरे, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार हे मुलाखतीसाठी नव्हते. याप्रकरणी आ.शिरसाट यांनी सांगितले, विद्यमान आमदारांसाठी मुलाखती नव्हत्या. इच्छुकांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मराठवाड्यात हदगाव, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर, वसमत, परभणी, जालना, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, उमरगा या जागांवर शिवसेनेचे उमेदवार २०१४ साली विजयी झाले होते. 

जागा वाटपावरून वादाची शक्यता
जालन्यातील बदनापूरमधून २०१४ साली भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेला तो मतदारसंघ मिळणार की नाही, यावरून वाद होऊ शकतो. औरंगाबादमध्ये मध्य, गंगापूर येथील जागा वाटपावरून वाद होऊ शकतात. भाजपकडे असलेले काही मतदारसंघ सेनेला हवे आहेत. सेनेचा जिथे पराभव अटळ आहे, अथवा यापूर्वीच विजय मिळालाच नाही, ते मतदारसंघ भाजपला हवे आहेत.

Web Title: Interviews of aspirants from Marathwada conducted by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.