माझ्या बाळाला मला घरी न्यायचंय..! आयसीयूमधील बाळाला कुशीत घेण्यासाठी आसूसलीय आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 02:45 PM2021-01-14T14:45:09+5:302021-01-14T14:45:58+5:30

भंडारा दुर्घटनेनंतर प्रत्येकाच्याच हृदयावर झालेली जखम अजूनही ताजीच आहे. आपले बाळ आयसीयूमध्ये भरती करावे लागलेल्या मातांची परिस्थिती तर आणखीनच अवघड झाली आहे.

I want to take my baby home ..! An ascetic mother to cuddle a baby in the ICU | माझ्या बाळाला मला घरी न्यायचंय..! आयसीयूमधील बाळाला कुशीत घेण्यासाठी आसूसलीय आई

माझ्या बाळाला मला घरी न्यायचंय..! आयसीयूमधील बाळाला कुशीत घेण्यासाठी आसूसलीय आई

googlenewsNext
ठळक मुद्दे बाळाची काळजी आणि मनात येणाऱ्या अकल्पित विचारांमुळे अनेक माता चिंताक्रांत मनातले दु:ख बोलून दाखविले नाहीत, तरी ते त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.

औरंगाबाद : आता लवकरच बाळाचा चेहरा दिसणार, दिवसरात्र तो माझ्या नजरेसमोर राहणार, या ओढीने हसतहसत सगळ्या बाळंतकळा सहन केल्या. बाळंतपणाचे दिव्य साेसल्यानंतर माझे बाळ माझ्या कुशीत तर आले, पण त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे त्याला लगेच माझ्यापासून दूर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. आता मात्र त्याला मी माझ्या कुशीत घेण्यासाठी अधीर झाले असून माझ्या बाळाला मला घरी न्यायचे आहे, अशा भावना अवघ्या ३- ४ दिवसांच्या बाळाला आयसीयूमध्ये ठेवाव्या लागलेल्या मातांनी व्यक्त केल्या.

बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आई धीर धरून ९ महिने दीर्घ प्रतीक्षा करते. पण ही प्रतीक्षा संपल्यानंतर पुन्हा जेव्हा प्रतीक्षाच वाट्याला येते आणि विशेषत: त्यासाठी जेव्हा बाळाची तब्येत हे कारण असते, तेव्हा मात्र ती आई हतबल होऊन जाते. अशाच हतबल आणि बाळाच्या प्रतीक्षेत असलेल्या माता घाटीच्या नवजात शिशू विभागाच्या बाहेर बसलेल्या होत्या. त्या स्वत: ओल्या बाळांतीणी होत्या. तरीही शारिरीक त्रास बाजूला सारून त्यांची बाळासाठी सूरू असलेली धडपड मातृहृदय काय असते, हे दाखवून देणारी होती.

भंडारा दुर्घटनेनंतर प्रत्येकाच्याच हृदयावर झालेली जखम अजूनही ताजीच आहे. आपले बाळ आयसीयूमध्ये भरती करावे लागलेल्या मातांची परिस्थिती तर आणखीनच अवघड झाली आहे. बाळाची काळजी आणि मनात येणाऱ्या अकल्पित विचारांमुळे अनेक माता चिंताक्रांत झाल्या आहेत. चिंता, मनातले दु:ख बोलून दाखविले नाहीत, तरी ते त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.

याविषयी बोलताना विभागप्रमुख डॉ. एल.एस. देशमुख म्हणाले की, आईने बाळाकडे जावे, त्याला दूध पाजावे, डोळेभरून पाहावे, यासाठी आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. भंडारा दुर्घटनेनंतर आम्ही फायर ऑडिट, इक्विपमेंट ऑडिट सुरू केले असून, आम्ही स्वत: जाऊन या सर्व बाबींची माहिती घेत आहोत.

तीन दिवसांपासून माझे बाळ नवजात शिशू विभागात दाखल आहे. कावीळ झाला आणि वजनही कमी आहे. त्याला सोडून मी कुठेही जाणार नाही. त्याच्या प्रतिक्षेत तीन दिवसांपासून आम्ही येथेच बसून आहोत. सर्व सोयी चांगल्या आहेत; पण तरीही आईचा जीव बाळासाठी तुटतोच.
- नेहा अंजूम

माझा नातू वजनाने कमी भरला. त्यामुळे २ तारखेपासून त्याला नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले आहे. जंगी स्वागत करून नातवाला घरी नेण्यासाठी आम्ही खूप उतावीळ आहोत. बाळाची आई मात्र त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटू शकते, दूध पाजू शकते, यातच आता आमचे समाधान आहे.
-मंगल पठारे

माझे बाळ ६ जानेवारीपासून नवजात शिशू विभागात दाखल आहे. त्याला दूध पाजण्यासाठी वारंवार आत जावे लागते. त्यामुळे मी आणि माझे काही नातेवाईक शिशू विभागाच्या बाहेरच बसून आहोत. आता आम्हाला लवकरच घरी जायचे आहे आणि ते ही बाळाला घेऊनच.
-तहसीन शेख परवेज

कामात काही बदल झाला आहे
नवजात शिशूंची काळजी आणि विभागातील सगळी व्यवस्था तपासणे ही कामे आम्ही आधीपासूनच बजावत आहोत. ते आमच्यासकट विभागातील सगळ्या स्टाफचेच नित्याचेच काम आहे. त्यामुळे भंडारा दुर्घटनेनंतर कामात काही बदल झाला आहे, असे नाही. फक्त एवढेच की, आता आम्ही अधिक सजग झालो आहोत.
-डॉ. अमोल जोशी, सहयोगी प्राध्यापक
 

Web Title: I want to take my baby home ..! An ascetic mother to cuddle a baby in the ICU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.