कोरोनामुळे पतीचे निधन, खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:03 PM2021-07-29T12:03:13+5:302021-07-29T12:06:30+5:30

इंदूरला नोकरी करणाऱ्या पतीचे मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे निधन झाले होते

Husband dies due to corona, exhausted wife ends her life by hanging | कोरोनामुळे पतीचे निधन, खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

कोरोनामुळे पतीचे निधन, खचलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

Next
ठळक मुद्देपतीविरहामुळे त्या पुरत्या खचल्या होत्या. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर केली आत्महत्या

औरंगाबाद : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या महिलेने बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड बायपासवरील सुमित्रा पॅराडाईज येथे घडली. रुपाली किशोर देशमुख (३४) असे मृत महिलेचे नाव आहे.

रुपाली यांचे पती इंदूरला नोकरीला होते. मागील लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे किशोर देशमुख यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुपाली या चार वर्षांच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहत होत्या.पतीविरहामुळे त्या पुरत्या खचल्या होत्या. बुधवारी दुपारी त्यांचे आई-वडील घराबाहेर गेले होते. त्यानंतर रुपाली यांनी दरवाजाला आतून कडी लावून घेत आतील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेतला.

घरी परतलेल्या आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतरही रुपाली दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांनी शेजाऱ्यांना बोलावत दरवाजा तोडला. तेव्हा रुपाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि चार वर्षांची मुलगी आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक पृथ्वीराज चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Web Title: Husband dies due to corona, exhausted wife ends her life by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app