माजी कुलगुरूंच्या काळातील घोटाळ्यांची नव्याने होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 02:38 PM2019-11-30T14:38:27+5:302019-11-30T14:40:34+5:30

एस.एफ. पाटील अहवालावर कार्यवाहीसाठी उचलली पावले

Former Vice-Chancellor's scams will be freshly investigated in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | माजी कुलगुरूंच्या काळातील घोटाळ्यांची नव्याने होणार चौकशी

माजी कुलगुरूंच्या काळातील घोटाळ्यांची नव्याने होणार चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देउच्च शिक्षण संचालकांचे प्रशासनाला पत्र

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील विविध भ्रष्टाचारांचा आरोप झालेल्या प्रकरणांची पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण सचिवांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना आदेश दिले आहेत. यानुसार चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (२७) उच्च शिक्षण विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. याला विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. माने यांनीही दुजोरा दिला आहे. 

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर बारकोड उत्तरपत्रिकांच्या खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा पहिला आरोप करण्यात आला होता. रुजू झाल्यानंतर त्यांनी तातडीने दोन वेळा सुमारे दीड कोटींच्या उत्तरपत्रिका खरेदी केल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन अधिसभा सदस्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने कुलगुरूंना वाचवण्यासाठी ‘नियम पायदळी तुडवले गेले; पण भ्रष्टाचार झालेला नाही’ असा शेरा मारून क्लीन चिट दिली होती. या प्रकरणानंतर विद्यापीठात विविध विभागांमध्ये चढ्या दराने खरेदी, ओएसडी भरती प्रकरण, परीक्षा विभागाचा ३ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी स्वत:च्या खात्यात वळती करणे, स्वत:च्या स्वाक्षरीने धनादेश देणे अशा विविध प्रकरणांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते.

याशिवाय विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतही नियमबाह्यपणे नेमणुका करण्यात आल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाला विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी वाचा फोडली होती. तेव्हाचे तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यपालांच्या मान्यतेनुसार कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यकाळातील सर्वच आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने चार महिने सर्व आरोपांची चौकशी करीत राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पुष्टी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाने कारवाई करण्यापूर्वी डॉ. एस. एफ. पाटील समितीच्या चौकशीतील तथ्याची पडताळणी करण्याचे  उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना आदेश दिले आहेत.

कागदपत्रांची पडताळणी होणार
राज्य शासनाकडे डॉ. पाटील समितीने सादर केलेला अहवाल राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.  त्यात डॉ. चोपडे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. हा अहवाल अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला आहे. शासन पुन्हा एकदा नव्याने अहवालातील आरोपांची शाहनिशा करणार आहे. याविषयी उच्च शिक्षण संचालक डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्य शासनाने तत्कालीन कुलगुरूंवर झालेल्या आरोपांची पडताळणी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी मला पत्र मिळाले. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून घोटाळ्यांचा आरोप असलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे सुचवले आहे. कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल. डॉ. पाटील समितीच्या अहवालाची सत्यता पडताळणे हाच शासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Former Vice-Chancellor's scams will be freshly investigated in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.