Farmers should take action on armyworm on time | शेतकऱ्यांनो लष्करी अळीवर वेळीच उपाययोजना करा
शेतकऱ्यांनो लष्करी अळीवर वेळीच उपाययोजना करा

ठळक मुद्दे५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी कराबीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्यांनी ७ व ११ जून रोजी मक्याची लागवड केली त्यांच्या पिकावर लष्करी अळीने कब्जा केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत उपाययोजना केल्या नाहीत, तर मका पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 

जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील सवंदगाव, लोणी बु., औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबाद येथील गदाना, सालुखेडा, कन्नड येथील रिठ्ठी या गावांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या लोकमतने प्रसिद्ध केल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी वर्गात खळबळ  उडाली आहे. शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उदय चौधरी यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जि. प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते. 

चौधरी म्हणाले की, राज्यात सर्वाधिक मका उत्पादन औरंगाबाद जिल्ह्यात घेतले जाते. येथील १ लाख ८० हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड होते तर जालना जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मका लागवड होते. लागवड झाल्यापासून १० दिवसांच्या आत अमेरिकन लष्करी अळीची लागण होते. शेतकऱ्यांच्या हातात फक्त ८ दिवस असून, या काळात उपाययोजना केल्या नाही तर ६० टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते. जर उपाययोजना केल्या तर ८० टक्के उत्पादन हातात येऊ शकते. जर काहीच उपाययोजना केल्या नाही तर लष्करी अळी पीक खाऊन टाकील व ३० ते ४० टक्के उत्पादन हाती येईल किंवा त्याचाही भरोसा नाही. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी तुकाराम मोटे यांनी सांगितले की, बीज प्रक्रिया केलेले बियाणे घेतल्यास २० दिवस त्यावर लष्करी अळीचा प्रभाव पडत नाही. पण त्यानंतर उपाययोजना केली नाही तर त्या पिकावरही लष्करी अळी हल्ला करू शकते. यामुळे बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यावरही उपाययोजना कराव्यात. आजघडीला फक्त ३५ टक्के बियाण्यावर बीज प्रक्रिया केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

५ जुलैपर्यंत मक्याची पेरणी करा
कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, मक्याची लागवड २२ जूनपासून सुरू झाली आहे. ५ जुलैपर्यंत संपूर्ण गावाने मक्याची लागवड आटोपून घ्यावी. त्यानंतर मक्याची उशिरा लागवड केल्यास त्यावर अळीचा जादा प्रादुर्भाव आढळून येईल. त्यामुळे ६ जुलैनंतर मक्याची लागवड करू नये. त्याऐवजी तूर, बाजरी इत्यादी पिकांचा विचार करावा. एकात्मिक पद्धतीने अवलंब केल्यास अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याचे होणारे नुकसान टाळता येईल. 

Web Title: Farmers should take action on armyworm on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.