विद्यापीठातील बनावट मार्गदर्शक शोधमोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:35 PM2019-09-20T18:35:14+5:302019-09-20T18:48:33+5:30

तक्रारी आल्यानंतर कुलगुरूंनी चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे

Fake Guide Search Campaign launched at BAMU university | विद्यापीठातील बनावट मार्गदर्शक शोधमोहीम सुरु

विद्यापीठातील बनावट मार्गदर्शक शोधमोहीम सुरु

googlenewsNext
ठळक मुद्दे गाईडशिपच्या संचिका तपासण्यास सुरुवात अपात्र प्राध्यापकांना पीएच.डी.चे गाईड बनविले असल्याचा आरोप

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील तीन वर्षांमध्ये देण्यात आलेल्या पीएच.डी.च्या गाईडशिपमध्ये अनेक अपात्र (बोगस) प्राध्यापकांचा समावेश असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कुलगुरूंनी चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि.१९) झाली. यात १ जानेवारी २०१७ ते विद्यमान कार्यकाळापर्यंत देण्यात आलेल्या गाईडशिपच्या संचिका तपासण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी अपात्र प्राध्यापकांना पीएच.डी.चे गाईड बनविले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकही दिवस प्राध्यापक नसतानाही अनेकांना गाईडशिप बहाल करण्यात आल्याचे प्रकार समोर आल्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसह इतरांनीही कुलगुरूंकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. याविषयी डॉ. येवले यांनी प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली चार अधिष्ठाता आणि पीएच.डी. विभागाच्या उपकुलसचिवांची समिती स्थापना १३ सप्टेंबर रोजी केली होती. या समितीला मंगळवारी पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार आयक्वॅकच्या कक्षात डॉ. वक्ते यांच्या अध्यक्षतेत सत्यसोधन समितीची पहिली बैठक गुरुवारी झाली. 

सुरुवातीला पीएच.डी. गाईड मिळवण्याच्या संदर्भात यूजीसीच्या निकषांना अभ्यासण्यात आले. त्यानंतर २०१६ रोजी तयार केलेल्या आॅर्डिनन्सचेही वाचन बैठकीत करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन नंतर समितीने काही टेबल्स तयार करून पीएच.डी.ची गाईडशिप दिलेल्यांच्या मूळ संचिका तपासण्यास सुरुवात केली.सायंकाळी पाचपर्यंत २५ पेक्षा अधिक जणांच्या संचिका तपासण्यात आल्याचे समजते. तपासण्यात आलेले सर्व प्राध्यापक निकषात बसणारे होते, अशी माहितीही समोर आली आहे. समिती आता दररोज बैठक घेणार असून, आगामी आठ दिवसांत प्रकरणाचा निपटारा करण्यात येणार आहे. या बैठकीला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे डॉ. मुरलीधर लोखंडे, मानव्य विद्याशाखेचे डॉ. सतीश दांडगे आणि आंतरविद्याशाखीयच्या डॉ. संजीवनी मुळे, डॉ. दिगंबर नेटके यांची उपस्थिती होती. 

गाईड होण्यासाठीचे नियम
- पीएच.डी.चे मार्गदर्शक होण्यासाठी महाविद्यालय
- विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती, पाच वर्षे अध्यापनाचा अनुभव
- विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांच्या यादीत नाव
- स्वत:ची पीएच.डी. होऊन किमान तीन वर्षे पूर्ण झालेली असावीत
- राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकात  पाच शोधनिबंधांचे प्रकाशन
- ज्या महाविद्यालयात अध्यापन करीत आहात त्याठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधन केंद्र असले पाहिजे, हे निकष आहेत.

Web Title: Fake Guide Search Campaign launched at BAMU university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.