लॉकडाऊननंतर बँकांमधील मुदत ठेवीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 07:57 PM2020-07-02T19:57:15+5:302020-07-02T19:57:35+5:30

आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींना बचतीच्या स्वरूपात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम जाणवला.

Doubling of term deposits in banks after lockdown | लॉकडाऊननंतर बँकांमधील मुदत ठेवीत दुपटीने वाढ

लॉकडाऊननंतर बँकांमधील मुदत ठेवीत दुपटीने वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे पैशांची बचत झाल्यामुळे अनेकांचा कल मुदत ठेवीकडे 

औरंगाबाद : एकीकडे कामगार, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम झाला, तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींना बचतीच्या स्वरूपात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम जाणवला. या काळात  वायफळ खर्च थांबल्याने वाचलेले पैसे मुदत ठेवीत ठेवण्यास अनेकांनी प्राधान्य दिल्याचे चित्र सध्या शहरातील विविध  बँकांमध्ये दिसत आहे. 

उच्च उत्पन्न गटात येणाऱ्या २५  ते ४५ वर्षे या वयोगटातील व्यक्तींचा जास्तीत जास्त खर्च हा त्यांची जीवनशैली सांभाळण्यावर आणि सुखचैनीवर होतो.  गरजेव्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या या  खर्चावर लॉकडाऊनमुळे मर्यादा आली. गरज नसताना केली जाणारी विविध वस्तूंची खरेदी, हॉटेलमध्ये दर महिन्याला होणारा खर्च, नाटक- सिनेमे आणि तत्सम मनोरंजनावर होणारा खर्च, पर्यटन आणि बाहेर फिरणे बंद झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल यांच्या वापरावर आलेली मर्यादा या सर्वच गोष्टींमुळे लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात बचत झाली.

लॉकडाऊनपूर्वी महिन्याचा खर्च भागविण्यास १५ ते २० हजार रुपये लागायचे. आता हा खर्च अवघ्या ७ ते ८ हजारांवर आला आहे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कोणतीही वस्तू घरात आणली जात नाही. पूर्वी एखादी वस्तू पाहिजे असली की, लगेच दुकानात जायचे आणि त्या वस्तूसोबत इतरही अनेक वस्तू गरज  नसताना आणल्या जायच्या, असा अनेकांचा अनुभव आहे; पण आता मात्र आठवड्यातून एकदाच यादी करून बाहेर जाऊन मोजकेच सामान आणले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बचत झाली, असे अनेक महिलांनी सांगितले. दोन- तीन महिन्यांत बचत झाल्यामुळे जमा झालेली गंगाजळीच अनेकांनी बँकेत मुदत ठेवीच्या रूपात ठेवली. गोल्ड बॉण्ड, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या गुंतवणुच्या पर्यायांमध्ये परतावा अधिक दराने  मिळतो; पण त्यात जोखीम आहे. त्यामुळे बँकेचे व्याजदर तुलनेने कमी परतावा देणारे असले तरी  सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून अनेक जण बँकेलाच प्राधान्य देत आहेत.


ज्येष्ठांचा ओढाही बँकेकडेच
लॉकडाऊनपूर्वी साधारणपणे दिवसाला दोन ते तीन लोक मुदत ठेव करण्यासाठी यायचे; पण आता ते प्रमाण वाढले असून, दिवसाला आमच्या शाखेत चार ते पाच मुदत ठेवी होत आहेत. साधारणपणे याच प्रमाणात इतर बँकांमध्येही मुदत ठेवीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते. काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवी होत आहेत. या काळात सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिकही सर्व रक्कम मुदत ठेवीच्या स्वरूपात बँकांमध्येच ठेवत असल्याचे जाणवते आहे.
-अमित खडके, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र 

Web Title: Doubling of term deposits in banks after lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.